१ फेब्रुवारीपासून मुंबईतील वाहतूक नियम कडक; गर्दीच्या वेळी अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन केल्यास दंडासह वाहन जप्ती
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि दैनंदिन ट्रॅफिक जॅमची समस्या कमी करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या १ फेब्रुवारीपासून मुंबईत सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत अवजड वाहनांच्या प्रवेशावर पूर्णतः निर्बंध घालण्यात येणार आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास केवळ दंडच नव्हे, तर थेट वाहन जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, सकाळी ७ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेश मिळणार नाही. हे नियम मुंबईतील सर्व प्रमुख रस्ते, उड्डाणपूल तसेच एक्सप्रेस-वेवर लागू राहणार आहेत.
कार्यालयीन वेळेत ट्रक, ट्रेलर आणि अन्य अवजड वाहनांमुळे अनेकदा अरुंद रस्त्यांवर वाहतूक ठप्प होते. त्यामुळे किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागून नागरिकांचा मौल्यवान वेळ वाया जातो. नव्या निर्णयामुळे दक्षिण मुंबईपासून उपनगरांपर्यंतचा प्रवास अधिक सुरळीत होण्याची शक्यता असून बस, दुचाकी आणि खासगी वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवासाचा वेळ किमान २० ते ३० मिनिटांनी कमी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, या निर्बंधांतून रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने, दूध व भाजीपाला पुरवठा करणारी वाहने तसेच पाणीपुरवठ्याचे टँकर्स यांना वगळण्यात आले आहे. मात्र, इतर सर्व व्यावसायिक अवजड वाहनचालकांना या वेळांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहणार आहे. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे मुंबई वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.