नवीन दागिने बनविण्याच्या बहाण्याने सराफांची सव्वा तीन कोटींची फसवणूक; कोरेगाव पार्क पोलिसांकडून एकाला अटक
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे : नवीन दागिने तयार करून देण्याच्या बहाण्याने सोने, चांदी व रोख रक्कम स्वीकारून सराफ व्यावसायिकांची सव्वा तीन कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
याप्रकरणी संजय पुष्कराज राठोड (वय ५५, रा. सुजय गार्डन, मुंकुदनगर) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अमन कोरीमुथा (वय २७, रा. शांतीनगर सोसायटी, महात्मा फुले पेठ) याला अटक करण्यात आली आहे. तसेच पंकज जैन (कोरीमुथा), नेमीचंद कोरीमुथा आणि प्रणव कोरीमुथा (रा. शांतीनगर सोसायटी, महात्मा फुले पेठ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २२ जानेवारी २०२६ रोजी बंडगार्डन रोडवरील राठोड ज्वेलर्स येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय राठोड यांचे बंडगार्डन रोडवर ‘राठोड ज्वेलर्स’ हे दुकान आहे. पंकज जैन व नेमीचंद कोरीमुथा हे ‘नवकार ज्वेलर्स’ व ‘श्री नवकार प्लस’ या ज्वेलर्सचे मालक असून त्यांनी नवीन माळा तयार करून देण्याच्या नावाखाली राठोड यांच्याकडून सुमारे ६० किलो चांदी स्वीकारली होती. दोन ते तीन दिवसांत नवीन दागिने देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, ठरलेल्या मुदतीनंतरही दागिने न देता आरोपींनी संपर्क तोडला.
संशय बळावल्याने राठोड यांनी इतर व्यावसायिकांकडे चौकशी केली असता, आरोपींनी हरी विजय बाळकृष्ण देवकर यांच्याकडून ९८ लाख रुपये, तसेच उमेश दराडे यांच्याकडून ५० किलो चांदी देण्याच्या वायद्याखाली ४० लाख रुपये घेतल्याचे समोर आले. अशा प्रकारे अनेक सराफांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राठोड यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
या व्यवहाराची देखरेख करणारा आरोपींचा नातेवाईक अमन कोरीमुथा याला पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण पुढील तपास करीत आहेत.