आर्थररोड कारागृहात कैद्याचा राडा; पोलीसालाच जबर मारहाण
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – ऑर्थररोड कारागृह सर्वात सुरक्षित कारागृह म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे इथं हायप्रोफाईल कैद्यांनाही ठेवलं जातं. मुंबईवर हल्ला करणारा कसाब ही याच कारागृहात होता.पण हे कारागृह खरोखरच सुरक्षित आहे का? असा प्रश्न पडावा अशी घटना घडली आहे. कारागृहा सारख्या ठिकाणी पोलीसांवरच हल्ला करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा हल्ला तिथल्याच कैद्याने केला आहे. या हल्ल्यामुळे ऑर्थर रोड कारागृहात एकच खळबळ उडाली आहे. शिवाय कारागृह प्रशासनाबाबत ही प्रश्न निर्माण झाला आहे.
लोकेंद्र उदयसिंग रावत हा कैदी सध्या ऑर्थर रोड कारगृहात आपली शिक्षा भोगत आहे. जेलच्या मुख्य दारा जवळ मोकळी जागा आहे. त्या ठिकाणी काही पोलीस तैनात होते. त्यांच्याकडे पाहून रावत हा त्यांना शिव्या देवू लागला. त्यावेळी तिथे वाघ नावाचे पोलीस शिपाई होते. परिस्थिती पाहून त्यांनी रावत याला रोखण्याचा प्रयत्न केला. पण उलट रावत या गुन्हेगाराने वाघ या पोलीस शिपायावरच हल्ला केला. त्यात त्यांना जबर जखमी केले.
वाघ यांना मारहाण होत आहे हे पाहात इतर पोलीस ही धावते. त्यांच्या अंगावर ही रावत तुटून पडला. शेवटी त्याला कसे तरी रोखण्यात आले. अचानाक पोलीसांवरच कारागृहात झालेल्या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणी रावत याच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणण्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमी झालेल्या वाघ या पोलीस शिपायास रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान ऑर्थर रोड सारख्या तुरूंगात अशी घटना झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवाय कारागृह प्रशासन नक्की काय करत आहे असा प्रश्न ही निर्माण झाला आहे. कारागृहात शिस्त आणि धाक असणे गरजेचे आहे. पण इथं तो आहे का असचं म्हणावे लागेल. या आधी ही अशा काही घटना या ठिकाणी घडल्या आहेत. पण त्यावेळी कैदी आपसात लढत होते. यावेळी तर थेट पोलीसावरच हल्ला झाल्याने कारागृह आणि पोलीसांच्याच सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.