कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या शैक्षणिक संस्थांमध्ये पनवेल शहर वाहतूक शाखेकडून रस्ता सुरक्षा अभियान २०२६ उत्साहात
पनवेल | प्रतिनिधी
पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी अंतर्गत कार्यरत बार्न्स कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स तसेच बार्न्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेते कवी मोहन काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, वेगमर्यादेचे पालन, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे तसेच मद्यप्राशन करून वाहन न चालवण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे होणाऱ्या अपघातांची उदाहरणे देत पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने यांनी नियम पाळण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते कवी मोहन काळे यांनी रस्ता सुरक्षेवर आधारित प्रभावी कविता सादर करून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान जागृत केले. यावेळी औदुंबर पाटील आणि मोहन काळे यांच्या हस्ते महाविद्यालय व हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना कविता व विज्ञान विषयक एकूण ३५ पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. तसेच पनवेल वाहतूक शाखेच्या वतीने तयार करण्यात आलेली वाहतूक नियमावलीची जनजागृती कार्डे विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आली.
कार्यक्रमाचे नियोजन पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार अमीर मुलाणी, युवराज येळे, विश्वनाथ पाटील, महेंद्र गळवी, योगिता पाटील व संजय घाडगे यांनी केले.
बार्न्स कॉलेजमध्ये कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रशांत पाटील यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. के. के. भोईर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी एनएसएस विभाग प्रमुख प्रा. चंद्रकांत मुकादम यांनी आभार मानले.
बार्न्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये कार्यक्रमाची प्रस्तावना रंजना गवळी यांनी केली, तर समीर शेवाळे यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाची सांगता उपस्थित सर्वांनी रस्ता सुरक्षेची शपथ घेऊन केली. या अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.