अजित पवारांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान संकुलाकडे रवाना; अंतिम दर्शनासाठी ठेवले जाणार
योगेश पांडे / वार्ताहर
बारामती – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव बुधवारी रात्री १० वाजेपर्यंत बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान संकुलात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. आपल्या लाडक्या ‘दादां’ना पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते बारामतीत दाखल झाले असून, तिथे केवळ ‘दादा… दादा…’ असा टाहो ऐकायला मिळाला. उद्या २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता याच मैदानावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार.
अजित पवारांचे निधन ही देशासाठी मोठी हानी असल्याचे सांगत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज सकाळी बारामतीत दाखल होणार आहेत. ते पार्थिवाचे दर्शन घेऊन पवार कुटुंबियांचे सांत्वन करतील. या पार्श्वभूमीवर, भारतीय वायुसेनेने बारामती विमानतळाची सूत्रे हातात घेतली असून तिथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
बुधवारी रात्री १० पर्यंत: विद्या प्रतिष्ठान, बारामती येथे अंतिम दर्शन. कार्यकर्त्यांची वाढती संख्या पाहून वेळ वाढू शकते.
उद्या पहाटे ६ ते ९: पार्थिव त्यांच्या मूळ गावी काटेवाडी येथील निवासस्थानी नेले जाईल. सकाळी ९ ते ११: पुन्हा विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंतिम दर्शनासाठी पार्थिव आणले जाईल. सकाळी ११ वाजता: पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.