सोन्याचे दागिने पॉलिशच्या बहाण्याने लंपास; दोन सराईत ठग अटकेत
पोलीस महानगर नेटवर्क
पालघर : सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो, असे भासवून ज्येष्ठ महिलेची फसवणूक करणाऱ्या दोन सराईत ठगांना बोईसर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे ४५.३२० ग्रॅम वजनाचे, अंदाजे ३.५० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पालघर जिल्ह्यातील गुन्हेगारीवर प्रभावी आघात मानली जात आहे.
१३ जानेवारी रोजी बोईसर भाजीमार्केट परिसरात हा प्रकार घडला. हंसीदेवी कुंदनसिंह रौतेला (वय ७३) या मकर संक्रांतीसाठी खरेदी करून आयसीआयसीआय बँकेजवळ थांबल्या असता, दोन अनोळखी इसमांनी त्यांच्याशी गप्पा मारत दागिने पॉलिश करून देण्याचा बहाणा केला. हातचलाखीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि हातातील चार बांगड्या काढून घेत, कागदांनी भरलेला रुमाल ‘दागिने आत आहेत’ असे सांगून त्यांच्या हाती देत आरोपी पसार झाले.
या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०९/२०२६ नोंदवून तपास सुरू करण्यात आला. पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे धिरज उर्फ पापा राजाराम राठोड (वय ४०) आणि दिनेश हिरालाल सोलंकी (वय ४२) अशी आहेत. धिरज राठोड हा मुंबई–नवी मुंबई परिसरातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांत फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. दिनेश सोलंकी याच्यावरही पूर्वी फसवणुकीचा गुन्हा नोंदवलेला आहे.
तपासादरम्यान आरोपींकडून गुन्ह्यातील सर्व सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत हाके करीत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, परिविक्षाधीन भा.पो.से. अधिकारी कुमार सुशांत, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. नागरिकांनी अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.