आईच्या कुकृत्याने नालासोपारा हादरलं!
मुलीचं डोकं खलबत्त्याच्या दांड्याने चेचून १५वर्षीय मुलीची हत्या; आरोपी आई पोलिसांच्या ताब्यात
योगेश पांडे / वार्ताहर
पालघर – नालासोपारा शहरातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात एका १५ वर्षीय मुलीच्या डोक्यात सील-बट्ट्याने वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अंबिका प्रजापती असं या मृत चिमुकलीचं नाव आहे. नालासोपाऱ्याच्या पूर्वेकडील विद्या विकास मंडळ चाळ, तांडा पाडा, संतोष भवन परिसरात शनिवारी सायंकाळी हि धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मृत मुलीची आई कुमकुम प्रजापती हिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, घटनेमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. यावेळी तुलिंज पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून पुढील कारवाई चालू आहे. मात्र या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.