मुंबई लोकलमध्ये किरकोळ वादातून शिक्षकाची हत्या; मालाड स्थानकात थरारक घटना, आरोपी व सहप्रवाशास अटक

Spread the love

मुंबई लोकलमध्ये किरकोळ वादातून शिक्षकाची हत्या; मालाड स्थानकात थरारक घटना, आरोपी व सहप्रवाशास अटक

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : लोकल ट्रेनमध्ये उभे राहण्यावरून झालेल्या क्षुल्लक वादाचे रुपांतर थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी मालाड रेल्वे स्थानकात घडली. या घटनेत ३३ वर्षीय शिक्षक आलोक सिंग यांचा निर्घृणपणे मृत्यू झाला.

विलेपार्ले येथील नरसी मोनजी कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेले आलोक सिंग हे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चर्चगेट–बोरिवली लोकलने प्रवास करत होते. ट्रेनमध्ये उभे राहण्याच्या कारणावरून आलोक यांचा एका प्रवाशाशी वाद झाला. संबंधित प्रवासी आलोक यांच्या पाठीमागे उभा असून वारंवार पुढे सरकण्यास सांगत होता. मात्र पुढे महिला प्रवासी असल्याने आलोक यांनी नकार दिला. यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि पुढे ती हाणामारीत बदलली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी रेल्वे पोलिसांना दिली.

दरम्यान लोकल मालाड स्थानकात दाखल होताच, उतरत असताना त्या प्रवाशाने अचानक धारदार शस्त्र काढून आलोक यांच्यावर वार केले. पोटात चाकू खुपसून आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आलोक यांना पाहून स्थानकात एकच गोंधळ उडाला.

माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आलोक यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र अतिरक्तस्रावामुळे रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिसांनी आरोपी व सहप्रवाशास अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे. लोकल प्रवासातील वाढत्या तणावामुळे घडलेल्या या घटनेने मुंबईकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon