पनवेलमध्ये वेश्याव्यवसाय बिनधास्त; शहरातील सामाजिक आरोग्य धोक्यात, घरंदाज महिलांना तोंड लपवण्याची नामुष्की
पनवेल : वेगाने विकसित होत असलेल्या पनवेल शहरात खुलेआम सुरू असलेल्या वेश्याव्यवसायामुळे सामाजिक वातावरण धोक्यात आले आहे. शहरातील प्रमुख व वर्दळीच्या भागांमध्ये दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या अनैतिक प्रकारांमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. आंबेडकर रस्त्यापासून शिवाजी सर्कलपर्यंतच्या परिसरात वेश्या उभ्या राहून ग्राहक शोधत असल्याचे चित्र नित्याचे झाले असून यामुळे शहराच्या प्रतिष्ठेला तडा जात आहे.
या भागातून शाळकरी मुले, महिला व कुटुंबीयांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. अशा ठिकाणी खुलेआम सुरू असलेला वेश्याव्यवसाय लहान मुलांच्या मानसिक जडणघडणीसह समाजातील नैतिक मूल्यांवर घातक परिणाम करणारा ठरत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
याशिवाय प्रशांत लॉज, श्री दत्ता इन लॉजिंग आणि जय माम इन स्वराज लॉज या काही लॉजमध्येही वेश्याव्यवसाय चालत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. या ठिकाणी दिवस-रात्र संशयास्पद हालचाली सुरू असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भीती व संतापाचे वातावरण आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात यापूर्वी कळंबोली, खांदा कॉलनी, बसस्थानक परिसरात वेळोवेळी छापे टाकून कारवाई करण्यात आली आहे. मात्र, शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसाढवळ्या हे प्रकार सुरू असणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे, अशी नागरिकांची भावना आहे.
महिला सुरक्षितता, बालकांचे मानसिक आरोग्य आणि सार्वजनिक सुव्यवस्था यावर थेट परिणाम करणाऱ्या या प्रकारांकडे पनवेल शहर पोलीस ठाणे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. नियमित छापे, सखोल तपास आणि कठोर कारवाईशिवाय या अनैतिक व्यवसायाला आळा बसणार नाही, असा ठाम सूर स्थानिक नागरिकांनी लावला आहे.
अन्यथा, पनवेलसारख्या विकसनशील शहराची ओळख अशा गैरप्रकारांमुळे डागाळली जाण्याची भीती व्यक्त होत आहे. समाजहितासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी होत आहे.