मालाडमध्ये मेट्रो पुलाखाली बसला भीषण आग; पश्चिम द्रुतगती महामार्गावर आगीचे लोळ, वाहतूक विस्कळीत
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सकाळच्या सुमारास एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली. मालाड पूर्व येथील कुरार व्हिलेज परिसरात, मेट्रो लाईन ७ च्या पुलाखाली धावत्या बसला अचानक भीषण आग लागली. आगीचे स्वरूप इतके रौद्र होते की, धुराचे लोट थेट मेट्रो पुलाच्या वरपर्यंत जात होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस मालाडच्या दिशेने जात असताना इंजिनमधून अचानक धूर येऊ लागला आणि काही क्षणातच बसने पेट घेतला. ही घटना मेट्रोच्या उन्नत पुलाखालीच घडल्याने आग पुलाला लागण्याची भीती निर्माण झाली. आगीची माहिती मिळताच बसमधील प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले.
या आगीमुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील बोरिवलीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. खबरदारीचा उपाय म्हणून मेट्रो प्रशासनाने या भागातून धावणारी मेट्रो थांबविण्यात आली. आगीचे लोळ मेट्रो रुळांच्या अगदी जवळ पोहोचल्याने मेट्रोच्या रेड लाईनवरील सेवेवरही काही काळ परिणाम झाला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण आणले. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.