सलूनमधील ओळखीचा गैरवापर; मंदिरात खोटे लग्न लावून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
पोलीस महानगर नेटवर्क
वसई : लग्नाचे खोटे आमिष दाखवून अल्पवयीन शालेय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वसईत उघडकीस आली आहे. या प्रकरणी नायगाव पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.
मुंबईत वास्तव्यास असलेल्या पीडित अल्पवयीन मुलीची सलूनमध्ये काम करणाऱ्या तरुणाशी ओळख झाली होती. या ओळखीचे पुढे मैत्रीत रूपांतर झाले. त्यानंतर आरोपीने तिचा विश्वास संपादन करून तिला विरार येथील जीवदानी मंदिरात नेले. तेथे तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधून ‘आपले लग्न झाले आहे’ असा खोटा भास निर्माण करत त्याने तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
१७ जानेवारी रोजी ही मुलगी शाळेत जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली होती. वसई रेल्वे स्थानकावर ती आरोपीला भेटण्यासाठी आली असताना रेल्वे पोलिसांना संशय आल्याने चौकशी करण्यात आली. पोलिसांनी पालकांना बोलावून मुलीला त्यांच्या ताब्यात दिले. घरी परतल्यानंतर आरोपीकडून झालेल्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला, त्यानंतर पीडितेने नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या घटनेमुळे परिसरात संतापाची भावना व्यक्त होत आहे. अल्पवयीन मुलीला भावनिकरित्या फसवून धार्मिक स्थळाचा गैरवापर करत खोटे लग्न लावणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सलूनमध्ये काम करत असताना झालेल्या ओळखीचा फायदा घेत आरोपीने विश्वास संपादन केला आणि त्यानंतर त्याचा गैरवापर केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
नायगाव पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीनुसार पोक्सो कायद्यासह संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला असून पीडितेचा जबाब घेण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणी व अन्य पूरक तपास सुरू असून, या घटनेमुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पालकांनी व समाजाने अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे पोलिसांनी सांगितले.