मेडिकल प्रवेशाच्या नावाखाली १३ लाखांची फसवणूक; आयुर्वेदिक संस्थेच्या संचालकाविरोधात गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
बुलढाणा : वैद्यकीय महाविद्यालयात मुलीला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार बुलढाणा जिल्ह्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलीस ठाण्यात आयुर्वेदिक संशोधन संस्थेच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे राज्यातील वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
डॉ. प्रशांत रानडे (वय ६५) असे आरोपीचे नाव असून, तो सातारा जिल्ह्यातील मायणी (ता. खटाव) येथील रुरल इन्स्टिट्यूट आयुर्वेदिक रिसर्च सेंटरचा संचालक आहे. सध्या तो मुंबईतील बोरीवली पूर्व येथील काजूपाडा परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तक्रारदार पालकांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने त्यांच्या मुलीला वैद्यकीय शिक्षण संस्थेत थेट प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यासाठी व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश होईल, संबंधित मंडळांशी आपले चांगले संबंध असल्याचे भासवत त्याने विश्वास संपादन केला. या आमिषाला बळी पडत पालकांनी टप्प्याटप्प्याने एकूण १३ लाख रुपयांची रक्कम आरोपीकडे दिली. मात्र, बराच कालावधी उलटूनही प्रवेश मिळाला नाही. वारंवार विचारणा केल्यानंतरही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत डोणगाव पोलिसांनी आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, आर्थिक व्यवहार, कागदपत्रे व इतर संबंधित बाबींची तपासणी सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणी फसवले गेले आहे का, तसेच आरोपीने याआधीही अशा प्रकारे पालकांची फसवणूक केली आहे का, याचाही तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
विशेष बाब म्हणजे, ही घटना बुलढाणा जिल्ह्याचे खासदार तसेच केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मंत्रालयाशी संबंधित वैद्यकीय शिक्षण क्षेत्राशी निगडित असल्याने या प्रकरणाकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील गैरप्रकार, दलाली व फसवणुकीचे प्रकार पुन्हा एकदा समोर आल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
दरम्यान, वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश देण्याच्या नावाखाली कोणीही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी अधिकृत प्रवेश प्रक्रिया, शासन मान्य कोटा व संस्थांची माहिती तपासूनच निर्णय घ्यावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.