खारघरमधील ८० वर्षीय निवृत्त वृद्धाची ४.३८ कोटींची सायबर फसवणूक; बनावट कागदपत्रे व अटकेची धमकी देत पैसे उकळले

Spread the love

खारघरमधील ८० वर्षीय निवृत्त वृद्धाची ४.३८ कोटींची सायबर फसवणूक; बनावट कागदपत्रे व अटकेची धमकी देत पैसे उकळले

पोलीस महानगर नेटवर्क

नवी मुंबई :खारघर येथील ८० वर्षीय निवृत्त वृद्धाची तब्बल ४ कोटी ३८ लाख ६२ हजार २१० रुपयांची सायबर फसवणूक झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून या प्रकारामुळे नवी मुंबईसह राज्यभर खळबळ उडाली आहे. बनावट शासकीय कागदपत्रे, नोटिसा आणि अटकेची धमकी देत सायबर गुन्हेगारांनी वृद्धाला मानसिक दबावाखाली आणून ही रक्कम उकळल्याचे तपासात समोर आले आहे.

फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव सुरेंद्रकुमार शर्मा (वय ८०) असून ते खारघर येथे वास्तव्यास आहेत. शांत निवृत्त जीवन जगत असलेल्या शर्मा यांना २१ नोव्हेंबर २०२५ ते ९ जानेवारी २०२६ या कालावधीत अज्ञात सायबर गुन्हेगारांनी जाळ्यात ओढले. फोन कॉल्स, व्हॉट्सॲप आणि इतर ऑनलाइन माध्यमांतून संपर्क साधत आरोपींनी स्वतःला शासकीय यंत्रणांशी संबंधित असल्याचे भासवले.

विशेष म्हणजे आरोपींनी विश्वास संपादन करण्यासाठी संदीप राव, प्रदीप जैसवाल आणि विश्वास नांगरे पाटील यांसारख्या वरिष्ठ व ओळखीच्या अधिकाऱ्यांची नावे वापरली. बनावट शासकीय नोटिसा, पत्रे आणि कागदपत्रे पाठवून फिर्यादी एखाद्या गंभीर गुन्ह्यात अडकला असल्याचा आभास निर्माण करण्यात आला. “तुमच्यावर गुन्हा दाखल असून तातडीने अटक होऊ शकते,” अशी धमकी देत समाजात बदनामीची भीती दाखवण्यात आली.

या तीव्र मानसिक दबावामुळे वृद्धाने आरोपींनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांमध्ये एकूण ४ कोटी ३८ लाख ६२ हजार २१० रुपये वर्ग केले. ही रक्कम त्यांच्या आयुष्यभराच्या बचतीची असल्याने या घटनेमुळे वृद्ध नागरिकाला मोठा मानसिक धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणी नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून बी.एन.एस. तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून आरोपींच्या शोधासाठी तपास सुरू आहे. वापरण्यात आलेले मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक, आर्थिक व्यवहारांची साखळी आणि डिजिटल पुरावे तपासले जात असून वेगवेगळ्या राज्यांतील बँक खात्यांचा वापर झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, सायबर पोलिसांनी नागरिकांना अज्ञात कॉल्स, बनावट नोटिसा आणि अटकेच्या धमक्यांपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon