अजित पवारांना सर्वात मोठा धक्का?

Spread the love

अजित पवारांना सर्वात मोठा धक्का?

प्रचार संपताच अजितदादांचे राजकीय सल्लागार असलेल्या नरेश अरोरा यांच्या कंपनीवर क्राईम ब्रांचची मोठी कारवाई.

योगेश पांडे / वार्ताहर

पुणे – राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. महानगरपालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून येत्या १६ जानेवारी रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. त्याआधी आता प्रचाराची सांगता झाली असून प्रचारादरम्यान अनेक नेतेमंडळी एकमेकांवर सडकून टीका करताना दिसले. विशेष म्हणजे सध्या महायुती म्हणून सत्तेत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर सडकून टीका केली. पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भाने हे दोन्ही नेते समोरासमोर आलेले पाहायला मिळाले. दरम्यान, आता प्रचाराची सांगता झालेली असताना आणि मतदान अवघ्या दोन दिवसांवर आलेले असताना अजित पवार यांना एका प्रकारे मोठा धक्का बसला आहे. अजितदादांचे राजकीय सल्लागार असलेल्या नरेश अरोरा यांच्या कंपनीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्याशी संबंधित डिझाईन बॉक्सच्या पुणे कार्यालयावर क्राईम ब्रांचने कारवाई केली आहे. क्राईम ब्रांचच्या पथकाकडून पुणे येथील डिझाईन बॉक्स ऑफिसमध्ये कागदपत्रांची तपासणी व चौकशी करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या या कारवाईने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे सध्या वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. ही कारवाई नेमकी कोणत्या प्रकरणाशी संबंधित आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही पोलिसांनी दिलेली नाही. परंतु पोलीस तपास करत आहेत.

राज्यात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. पिंपरी चिंचवड तसेच पुणे महापालिका आणि इतरही काही महापालिकांमध्ये विजयी पताका फडकवण्यासाठी अजित पवार यांनी पूर्ण ताकद लावली आहे. महापालिकेनंतर आता फेब्रुवारी महिन्यात १२ जिल्हापरिषद आणि १२५ पंचायत समित्यांचीही निवडणूक होणार आहे. त्यामुळे पुढचे काही महिने राजकीय अस्तित्त्वासाठी फारच महत्त्वाचे असणार आहेत. असे असतानाच अजित पवार यांनी राजकीय सल्ला देणाऱ्या व्यक्तीच्या कंपनीवरच पोलिसांनी कारवाई केल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? कारवाई का झाली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon