बिनविरोध नगरसेवकांवर स्थगिती ठेवण्याच्या अविनाश जाधवांच्या मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज तातडीची सुनावणी
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांच्या विरोधात मनसे नेते अविनाश जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. दुसरीकडे, आज बिनविरोध संदर्भातील याचिकेवर तातडीची सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. या याचिकेच्या माध्यमातून जे नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत त्यांच्यावर स्थगिती देण्यात यावी आणि जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत स्थगिती कायम ठेवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अविनाश जाधव यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिके संदर्भात आज सकाळीच सुनावणी होणार आहे. प्रचार संपल्यानंतर या सुनावणीमधून मुंबई उच्च न्यायालयाने मनसेचे म्हणणे मान्य केलं, तर सर्व बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांच्या निवडीवर स्थगिती येऊ शकते. दरम्यान, मनसेकडून दुबार मतदारांची यादी फोटोसहीत तयार असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले. त्यामुळे मतदानाला असे मतदार आल्यानंतर त्यांची मनसेकडून चांगल्या प्रकारे स्वागत केलं जाईल, असा इशारा देखील अविनाश जाधव यांनी दिला.
निवडणुका बिनविरोध जिंकण्यात भाजपने आघाडी घेतली असून आतापर्यंत पक्षाचे ४४ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. त्याखालोखाल शिंदेंच्या शिवसेनेने दुसरा क्रमांक मिळवला असून त्यांचे २२ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपचे सर्वाधिक १५ तर शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. याशिवाय अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे २ उमेदवार, तर मालेगावमधून इस्लाम पार्टीचा १ आणि एका अपक्ष उमेदवाराचाही बिनविरोध विजय झाला आहे.
राज ठाकरे यांनी ठाण्यातून सभेतून बिनविरोध निवडीवरून हल्लाबोल केला होता. तसेच १ कोटीपासून १५ कोटीपर्यंत ऑफर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आणली होती. राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रामध्ये ६६ ठिकाणी पैसे देऊन पैसे वाटून फॉर्म माघारी घ्यायला लावले. मनसे उमेदवारांना दिलेल्या मोठ्या ऑफर्स सुद्धा त्यांनी सांगितल्या. ते म्हणाले, शैलेश धात्रक आणि त्यांच्या कुटुंबातील तीन लोकांना एका घरात मिळून १५ कोटी रुपयाची ऑफर दिली गेली. राजश्री नाईक यांना पाच कोटीची ऑफर झाली. सुशील आवटे यांना एक कोटी रुपयाची ऑफर झाली, पण नाकारले. या परिस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले, महाराष्ट्रभर पैसे वाटलेत, कोणाला पाच कोटी, कोणाला १० कोटी, कोणाला १५ कोटी, कोणाला एक कोटी दोन कोटी… ही कोणती महाराष्ट्राची निवडणूक आहे? अहो इतकी वर्ष निवडणुका आम्ही बघतोय, पण अशी निवडणूक नाही पाहिली. १५ कोटी रुपयाची ऑफर नाकारणारे कुठे आणि पाच पाच हजार रुपयामध्ये मत विकणारे कुठे? अशी विचारणा त्यांनी केली.