नवी मुंबईत पुन्हा शिवसेना विरुद्ध भाजप राडा!
पैसे वाटल्याचा आरोप करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकाला चोपलं; घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्यातील संघर्षामुळे कमालीची रंगतदार झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील वाकयुद्धामुळे नवी मुंबईतील वातावरण प्रचंड तापले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे भाजप आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची घटना घडली. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे ही घटना घडली.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये भाजपचे कार्यकर्ते शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला मारहाण करताना दिसत आहेत. शिंदे गटाचा कार्यकर्ता कोपरखैरणे गावात मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. शिंदे सेनेचा हा कार्यकर्ता हातात सापडल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेच्या या कार्यकर्त्याचे दोन्ही हात मागे पिरगळून धरले होते. दोन्ही बाजूंनी भाजपचे कार्यकर्ते शिंदेंच्या कार्यकर्त्याला फटकावत होते. त्याच्या थोबाडीत मारण्यात आल्या. या कार्यकर्त्याने फोन लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो हिसकावून घेण्यात आला. त्यानंतर भाजपच्या एका कार्यकर्त्याने शिंदे सेनेच्या या कार्यकर्त्याला गळा आवळला. मात्र, शिंदे सेनेचा हा कार्यकर्ता कसाबसा निसटून भाजपच्या फौजेशी एकटाच लढत होता. मला मारु नका, असे तो वारंवार बजावत होता. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे मतदानापूर्वी नवी मुंबईत भाजप आणि शिंदे गटातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.