वैध व समाधानकारक कारण सादर न करता निवडणूक कर्तव्यावर जाणीवपूर्वक अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार; सहआयुक्तांची कठोर कारवाई

Spread the love

वैध व समाधानकारक कारण सादर न करता निवडणूक कर्तव्यावर जाणीवपूर्वक अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार; सहआयुक्तांची कठोर कारवाई

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच एक मोठी घडामोड समोर आली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या आदेशानंतरही जे कर्मचारी निवडणूक ड्युटीवर हजर नाहीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेने दिले आहेत. मुंबई महापालिकेचे सहआयुक्त विश्वास शंकरवार यांनी हे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक व मतमोजणी कामकाजाकरिता कर्मचाऱ्यांची सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत लेखी आदेशाने नियुक्ती करण्यात आलेली होती. सदर नियुक्ती आदेश प्राप्त होऊनही काही कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तसेच कोणतेही वैध व समाधानकारक कारण सादर न करता निवडणूक कर्तव्यावर जाणीवपूर्वक अनुपस्थिती दर्शविलेली आहे, असा ठपका मुंबई पालिका उपयुक्तांनी ठेवला आहे.

तसेच निवडणूक कर्तव्य हे कायद्याने बंधनकारक असून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे हा गंभीर व दंडनीय गुन्हा आहे. यासंदर्भात सदर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली असूनही त्यांनी निर्धारित कालावधीत समाधानकारक उत्तर सादर केलेले नाही तसेच प्रत्यक्ष कर्तव्यावर हजर राहण्यास टाळाटाळ केलेली आहे.

सदर कृत्य हे बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक मार्गदर्शक सूचना तसेच मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ मधील तरतुदींचे स्पष्ट उल्लंघन असून, सार्वजनिक कर्तव्याच्या अंमलबजावणीस अडथळा निर्माण करणारे आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार फौजदारी कारवाई करणे अपरिहार्य ठरते, असे पत्र लिहित त्यांनी दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon