जुहू परिसरातील तब्बल ३५ हजार नागरिकांचा मतदानावर बहिष्कार; प्रत्येक सोसायटीच्या गेटवर बॅनरबाजी

Spread the love

जुहू परिसरातील तब्बल ३५ हजार नागरिकांचा मतदानावर बहिष्कार; प्रत्येक सोसायटीच्या गेटवर बॅनरबाजी

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – एकीकडे जास्तीत जास्त मुंबईकरांनी मतदानासाठी बाहेर पडावं यासाठी प्रशासन प्रयत्नशील असताना जुहू परिसरातील सुमारे ३५ हजार नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचं जाहीर केलं आहे. जुहू परिसरातील जवळपास २०० इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी तसा निर्णय घेतला आहे. मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याच्या आशयाचे अनेक बॅनर जुहू रुईया पार्क, कराची सोसायटी परिसरात लागल्याचं दिसतंय.

जुहू परिसरात मिलिटरी रडार असल्यामुळे त्याचा फटका इथल्या नागरिकांना बसत असल्याचं चित्र आहे. गेल्या ३५ वर्षापासून इथल्या २०० धोकादायक इमारती आणि दोन झोपडपट्टी विकासकापासून रखडल्या आहेत. इमारतींचे पुनर्विकास होऊ शकत नसल्याने जवळपास ३५ हजार लोक या धोकादायक इमारतींमध्ये भीतीच्या सावटाखाली राहतात असा दावा करण्यात आला आहे.या परिसरातील २०० इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिक आणि दोन झोपडपट्ट्यांमधील लोकांनी त्यांच्या समस्या या केंद्र सरकारच्या संरक्षण विभागासमोर मांडल्या. अनेकदा त्याचा पाठपुरवठा करूनही त्यांना यश आलं नाही.

SR0150 कायदा कालबाह्य आहे आणि त्यामुळे घरे उद्ध्वस्त होत आहेत. १९३९ च्या ब्रिटिश कायद्याअंतर्गत (1976 मध्ये अंमलात आणलेला) आम्हाला आमच्या कायदेशीर घरांमधून हाकलण्यात आले आहे. सुमारे २०० इमारती आणि दोन मोठ्या झोपडपट्ट्या धोक्यात असून इथल्या ३५,००० नागरिकांवर अन्याय होत आहे. त्यामुळे मतदानासाठी बाहेर पडण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा आणि पुन्हा विचार करा. यापुढे खोटी आश्वासने आता चालणार नाहीत.

लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत नेत्यांनी त्यांच्या प्रश्नावर निवडणुकीनंतर तोडगा काढणार असं आश्वासन दिले होते. मात्र निवडणुकीनंतर कोणताही नेता मदत करत नसल्याचं सांगत रहिवाशांनी पालिका निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घातला आहे.

जुहू रुईया पार्क आणि कराची सोसायटी परिसरात रहिवाशांकडून मतदानावर बहिष्कार घातल्याचे अनेक बॅनर झळकल्याचं दिसून आलं. त्यानंतर प्रभाग क्रमांक ६८ मधील मनसेचे उमेदवार संदेश देसाई यांनी तिथल्या रहिवाशांची भेट घेतली.

यावेळी मनसे उमेदवार संदेश देसाई यांनी निवडणुकीनंतर इथल्या रहिवाशांना दोन्ही ठाकरे बंधूंची भेट घालून, या प्रश्नाचा पाठपुरावा करू आणि त्यावर योग्य तो तोडगा काढू असं आश्वासन दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon