महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाणे पोलीस सज्ज; १०,९०८ पोलीस, ६,२९५ होमगार्ड तैनात

Spread the love

महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाणे पोलीस सज्ज; १०,९०८ पोलीस, ६,२९५ होमगार्ड तैनात

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणूक–२०२६ साठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, ही प्रक्रिया शांततेत, सुरळीत व निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून व्यापक पूर्वतयारी करण्यात आली आहे.

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाने मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ तैनात केले आहे. या अंतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालयातील तसेच बाहेरून आलेल्या घटकांतील मिळून एकूण १०,९०८ पोलीस अधिकारी व अंमलदार नियुक्त करण्यात आले आहेत. याशिवाय ६,२९५ होमगार्ड देखील बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. अतिरिक्त सुरक्षेच्या दृष्टीने राज्य राखीव पोलीस बलाच्या ६ कंपन्या व १ प्लाटून उपलब्ध करून देण्यात आले आहे.

आचारसंहितेचा भंग होणार नाही, यासाठी संपूर्ण पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सतत नजर ठेवली जात असून मतदानाच्या दिवशी ही निगराणी अधिक प्रभावी करण्यात येणार आहे. तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांची दैनंदिन तपासणी करून त्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे.

संवेदनशील व तणावग्रस्त भागांमध्ये स्थानिक पोलिसांच्या मदतीने रूट मार्चचे आयोजन करून ‘एरिया डॉमिनेशन’ राबवले जात असून, निवडणूक काळात कोणतीही कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास ती हाताळण्यासाठी पोलीस दल पूर्णतः सज्ज असल्याचे आश्वासन नागरिकांना देण्यात येत आहे.

१५ जानेवारी रोजी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीतील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात आल्याचे ठाणे पोलीस आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon