तुर्भे नाका येथील राज लॉजमध्ये सुरु असलेल्या कूकृत्याचा पर्दाफाश; ७ महिलांची सुखरूप सुटका,३ आरोपींना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई – नवी मुंबईच्या तुर्भे नाका परिसरातील ‘राज’ लॉजमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर देहविक्री व्यवसायावर अनैतिक मानव तस्करी विरोधी विभागाने धडक कारवाई करत मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. या कारवाईत पोलिसांनी ७ महिलांची सुखरूप सुटका केली आहे. पोलिसांनी तरुणींचा सौदा करणाऱ्या ३ आरोपींना अटक केली आहे. मात्र लॉजचा मुख्य संचालक करणाकर शेट्टी हा फरार आहे. त्याच्या शोधासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.
अनैतिक मानव तस्करी विरोधी विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना तुर्भे नाका भागातील एका लॉजमध्ये ग्राहकांकडून पैसे घेऊन महिलांचा आणि तरुणींचा सौदा केला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचत एका बनावट ग्राहकाला लॉजमध्ये पाठवले. सदर बनावट ग्राहकाने महिलांपैकी एका महिलेला पसंती दर्शवली असता, त्याच्याकडून मोबदल्यापोटी ३५०० रुपये स्वीकारण्यात आले. या व्यवहारामुळे देहव्यापार सुरू असल्याची स्पष्ट पुष्टी मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ छापा टाकण्यात आला.
या छाप्यादरम्यान लॉजमध्ये ७ महिलांना देहव्यापारासाठी ठेवण्यात आल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळी लॉज व्यवस्थापक अजय कैलास गोस्वामी, महिला पुरवठादार किशोर पूर्णचंद्र साहू आणि वेटर अजय कुमार यांना ताब्यात घेत अटक केली. प्राथमिक तपासात हे आरोपी संगनमताने महिलांना लॉजमध्ये आणून ठेवत, ग्राहकांच्या पसंतीनुसार व्यवहार ठरवत आणि मिळालेली रक्कम आपसात वाटून घेत असल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी बनावट ग्राहकाकडून देण्यात आलेली रक्कम जप्त केली आहे. ती या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा मानली जात आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरोधात अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या रॅकेटमागील आणखी व्यक्तींची माहिती मिळवण्यासाठी सखोल चौकशी सुरू आहे.