महाराष्ट्र हादरला : पुण्यात पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमधून आजारपणाचे कारण उघड
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे : राज्याच्या पोलीस दलातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगली पोलीस दलात कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक सुरज मराठे (वय २५) यांनी पुण्यात विष प्राशन करून आत्महत्या केली. डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजमध्ये ही घटना उघडकीस आली असून, त्यांच्या आत्महत्येमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
पोलिसांना घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये दीर्घकाळच्या आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा उल्लेख असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सुरज मराठे हे सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे कार्यरत होते. अवघ्या २५व्या वर्षी त्यांची सहायक पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरज मराठे हे पुण्यातील एका लॉजमध्ये वास्तव्यास होते. बराच वेळ संपर्क न झाल्याने लॉज कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्या वेळी त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले.
मराठे यांचे कुटुंब पुणे जिल्ह्यातील देहू येथे वास्तव्यास आहे. गुडघ्याच्या आजारामुळे ते गेल्या काही दिवसांपासून रजेवर होते. उपचारासाठी ते वारंवार पुण्यात येत असत. यंदाही उपचारासाठी पुण्यात आले असताना त्यांनी लॉजमध्ये मुक्काम केला होता. उपचारानंतर परत लॉजवर आल्यानंतर त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
घटनास्थळी सापडलेल्या शेवटच्या चिठ्ठीच्या आधारे आत्महत्येचे कारण आजारपण असल्याचे स्पष्ट होत असले तरी, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे.