छत्रपती संभाजीनगरमध्ये मोबाईल आणि पैशांच्या वादातून तरुणाची निर्घृणपणे हत्या; सराईत गुन्हेगाराला पोलीसांनी ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
छत्रपती संभाजीनगर – मोबाईल आणि पैशांच्या वादातून एका सराईत गुन्हेगाराने आपल्या साथीदारांसह मिळून आपल्याच मित्राचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छावणी परिसरात एका २० वर्षीय तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जटवाडा येथील डोंगराळ भागात फेकून देण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. शकील आरेफ शेख (२०) असं मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे.
या घटनेप्रकरणी सय्यद सिराज अली या सराईत गुन्हेगार आरोपीला याला अटक करण्यात आली आहे. शकील आरेफ शेख हा गेल्या ४ जानेवारीपासून बेपत्ता होता. बेपत्ता होण्यापूर्वी मुख्य आरोपी सिराज याने शकीलच्या आईला फोन करून मोबाईल आणि पैसे परत न केल्यास मुलाला ठार मारण्याची धमकी दिली होती. ४ जानेवारीच्या रात्री शकील हा सिराजसोबत घराबाहेर पडला आणि त्यानंतर त्याचा संपर्क तुटला. काल मंगळवारी सकाळी मिटमिटा परिसरातील डोंगर भागात नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक मृतदेह आढळला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपास केला असता, तो मृतदेह शकीलचा असल्याचं निष्पन्न झालं.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी शकीलला कारमध्ये नेऊन तिथे धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले. क्रूरतेचा कळस गाठत आरोपींनी शकीलच्या शरीरावर सिगारेटचे चटके दिले आणि त्याचे हात-पाय व गळा चिरून त्याची हत्या केली. हत्येनंतर आरोपींनी मृतदेह जटवाडा परिसरातील डोंगरात फेकून दिला. गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी सिराज अली याला अटक केली असून, तो यापूर्वीही हत्येच्या गुन्ह्यात सामील होता आणि जामिनावर बाहेर होता. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्या, या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.