मानखुर्दमध्ये हाजी आरफात शेख यांचे प्रभावी आवाहन, युतीतील उमेदवारांच्या प्रचाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
रवि निषाद/मुंबई

मुंबई : मानखुर्द परिसरात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित कार्यक्रमात माजी अल्पसंख्यांक आयोग अध्यक्ष हाजी आरफात शेख यांच्या उपस्थितीने वातावरण भारावून गेले. कार्यक्रमस्थळी नागरिक आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. ठिकठिकाणी घोषणाबाजी आणि उत्स्फूर्त प्रतिसादातून प्रचाराला चांगलेच बळ मिळाल्याचे चित्र दिसून आले.
अल्पसंख्यांक समाजासह सर्व समाजघटकांमध्ये संवाद साधणारे प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे हाजी आरफात शेख यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करत महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी सर्वसमावेशक विकास आवश्यक असून, शहराच्या विकासासाठी स्थिर आणि सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या प्रचार कार्यक्रमात प्रभाग क्रमांक १३५ मधून श्री. नवनाथ उत्तम बन, प्रभाग क्रमांक १४१ मधून श्रीमती श्रुतिका मोरे, प्रभाग क्रमांक १४४ मधून श्री. दिनेश (बबलू) पांचाळ आणि प्रभाग क्रमांक १४२ मधून कुमारी अपेक्षा गोपाळ खांडेकर हे महायुतीचे अधिकृत उमेदवार उपस्थित होते. त्यांच्या समर्थनार्थ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
पुढील काळात व्यक्तिगत भेटी, बैठका आणि सभांच्या माध्यमातून प्रचार अधिक तीव्र केला जाईल, असे संकेत हाजी आरफात शेख यांनी दिले. मानखुर्दमध्ये झालेल्या या कार्यक्रमामुळे महायुतीच्या प्रचाराला नवे बळ मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.