नवी मुंबईत तरुणासोबत ऑनलाईन प्रेमाचा थरार!
इन्स्टाग्रामवर मुलगी असल्याचे भासवून १५ वर्षीय मुलाचे अपहरण; २० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या चौघांना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई – सोशल मीडियावरून मैत्री, प्रेमाचा बनाव आणि त्यातून थेट अपहरण व खंडणी असा थरारक प्रकार नवी मुंबईत उघडकीस आला आहे. मुलगी असल्याचे भासवून इन्स्टाग्रामवर एका चौकडीने १५ वर्षीय मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, त्याचा विश्वास संपादन केला. भेटीच्या बहाण्याने कल्याण (पूर्व) येथील नांदिवलीत बोलावून त्याचे अपहरण केले. या अपहरणानंतर नातेवाइकांकडे व्हॉट्सॲप व्हॉइस मेसेजद्वारे तब्बल २० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. मात्र, नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत चौघांना अटक करत मुलाची सुखरूप सुटका केली.
या घटनेतील १५ वर्षीय अपहृत मुलगा दहावीत शिकतो. या प्रकरणातील आरोपींनी बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून मुलगी असल्याचे भासवले. त्यानंतर अपहृत मुलाशी नियमित चॅटिंग करीत प्रेमसंबंध असल्याचा आभास निर्माण करून त्याचा पूर्ण विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपींनी प्रेयसीमार्फत या मुलाला भेटण्यासाठी कल्याण (पूर्व) येथील नांदिवलीचा पत्ता देऊन त्याला बोलावून घेतले. या आमिषाला बळी पडत अपहृत मुलगा ॲपआधारिक कारने दिलेल्या पत्त्यावर पोहोचला. मात्र त्या ठिकाणी वाट पाहत उभ्या असलेल्या चौघा अपहरणकर्त्यांनी त्याला ताब्यात घेऊन तेथील इमारतीतील एका खोलीत डांबून ठेवले.
अपहरणकर्त्यांनी मुलाच्या नातेवाइकांशी संपर्क साधून २० लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर अपह्रत मुलाच्या नातेवाइकांनी रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-1 च्या पथकाने घटनास्थळ व आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक तपासातून गाडीचा क्रमांक शोधून चालकाला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत चालकाने मुलाला नांदिवली येथे सोडल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी नांदिवली राजाराम नगर येथील साई आराधना अपार्टमेंटमधील खोली क्रमांक १ मध्ये छापा टाकताच अपहृत मुलगा चारही आरोपींसह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी अपह्रत मुलाची सुटका करून प्रदीपकुमार जयस्वाल (२४), विशाल पासी (१९), चंदन मौर्या (१९) आणि सत्यम यादव (१९) या चार जणांना अटक केली. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.