सोलापूरात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून २९ लाखांचा मुद्देमाल जप्त, ४२ गुन्हे दाखल तर ५० जणांवर कारवाई

Spread the love

सोलापूरात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून २९ लाखांचा मुद्देमाल जप्त, ४२ गुन्हे दाखल तर ५० जणांवर कारवाई

पोलीस महानगर नेटवर्क

सोलापूर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आचारसंहितेदरम्यान सोलापूर उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूविक्री आणि हातभट्टी निर्मितीविरोधात मोठी मोहीम राबवत २९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. २३ ते २६ डिसेंबर २०२५ या कालावधीत शहर व जिल्ह्यातील विविध ठिकाणी धडक कारवाया करत विभागाने ४२ गुन्हे दाखल केले असून ५० जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

सागर धोमकर (विभागीय उपायुक्त, पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक भाग्यश्री पं. जाधव आणि प्र.उपअधीक्षक जे. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये २८,२९० ब.ली. रसायन, १४३४ ब.ली. हातभट्टी दारू, १७५.५८ ब.ली. देशी दारू, १८ ब.ली. विदेशी दारू, ११ ब.ली. बिअर, ७५ ब.ली. ताडी यासह तीन चारचाकी व चार दुचाकी वाहने जप्त करण्यात आली.

अवैधरीत्या दारूविक्री व मद्यपानास परवानगी देणाऱ्या सात ढाब्यांवरही कलम ६८ व ८४ अन्वये गुन्हे दाखल झाले. हॉटेल जगदंबा, हॉटेल यशराज ढाबा, हॉटेल राजवाडा ढाबा, विलास कोल्ड्रिंक्स, चायनिज सेंटर (कंबर तलाव परिसर), हॉटेल वैष्णवी ढाबा यांसह अन्य ठिकाणी कारवाई करत २७ आरोपींच्या विरोधात गुन्हे नोंदविण्यात आले. यापूर्वी अशा प्रकरणात न्यायालयाने २५ ते ३० हजार रुपये द्रव्य दंड ठोठावला होता, अशी माहिती विभागाने दिली.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर १५ ते २६ डिसेंबर दरम्यान उत्पादन शुल्क विभागाने एकूण १४१ गुन्हे नोंदवत १४४ जणांवर कारवाई केली. या कालावधीत २० वाहनांसह तब्बल ९२ लाख ६९ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील काळातही अशा संयुक्त कारवाया अधिक वेगाने राबविण्यात येतील, असे विभागाने स्पष्ट केले.

या संपूर्ण मोहिमेत निरीक्षक ओ. व्ही. घाटगे, राकेश पवार, पंकज कुंभार, सचिन भवड यांच्यासह दुय्यम निरीक्षक राम निंबाळकर, धनाजी पोवार, सुखदेव सिद, सचिन शिंदे, समाधान शेळके, सुदर्शन संकपाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, संजय चव्हाण आणि जवानांचा मोठा सहभाग होता. महिला जवान शिवानी मुढे, वाहनचालक दिपाली सलगर, संजय नवले व दिपक वाघमारे यांनीही कारवाईत योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon