शहरात तीन मुलींचे अपहरण; वेगवेगळ्या भागांत गुन्हे दाखल

Spread the love

शहरात तीन मुलींचे अपहरण; वेगवेगळ्या भागांत गुन्हे दाखल

नांदूर नाका, पाथर्डी फाटा आणि उपनगर परिसरात प्रकार

पोलीस महानगर नेटवर्क

नाशिक : शहरातील वेगवेगळ्या भागांत तीन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तींनी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याच्या तीन स्वतंत्र घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

पहिली घटना नांदूर नाका परिसरात घडली. फिर्यादी काही कामानिमित्त घराबाहेर गेले असताना त्यांची मुलगी कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेली. ती उशिरापर्यंत घरी न परतल्याने शोध घेण्यात आला; मात्र तिचा थांगपत्ता लागला नाही. अज्ञात व्यक्तीने तिला आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी घटना पाथर्डी फाटा परिसरातील नरहरीनगर भागात घडली. फिर्यादींची मुलगी काल (दि. २१) सकाळी घरात होती. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने तिला कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसरी घटना उपनगर परिसरात घडली. फिर्यादींची मोठी मुलगी उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी कॉलेजला जाऊन येते, असे सांगून घरातून निघून गेली होती. मात्र ती अद्याप घरी परतली नाही. नातेवाइक व ओळखीच्या ठिकाणी शोध घेऊनही ती न मिळाल्याने उपनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन्ही प्रकरणांचा पोलीस स्वतंत्रपणे तपास करीत असून मुलींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत. नागरिकांनी कोणतीही माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon