‘आई होण्यासाठी मदत करा, २५ लाख मिळवा’; प्रेग्नन्सी मेसेजच्या आमिषातून सायबर फसवणूक; संभाजीनगरात सहा प्रकार उघड

Spread the love

‘आई होण्यासाठी मदत करा, २५ लाख मिळवा’; प्रेग्नन्सी मेसेजच्या आमिषातून सायबर फसवणूक; संभाजीनगरात सहा प्रकार उघड

पोलीस महानगर नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर : ‘मी आई होण्यासाठी तुमची मदत हवी आहे. त्याबदल्यात तुम्हाला २५ लाख रुपये देईन,’ अशा आमिषपूर्ण संदेशांद्वारे सायबर चोरटे तरुणांना जाळ्यात ओढत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही दिवसांत अशा सहा प्रकरणांची नोंद झाली असून अनेक तरुणांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.

सायबर चोरटे मोबाईल आणि सोशल मीडियावरून थेट संपर्क साधतात. सुंदर महिलांचे फोटो वापरून बनावट प्रोफाइल तयार केली जातात. स्वतःला श्रीमंत, अपत्यासाठी दीर्घकाळ प्रयत्न करणारी पण गर्भधारणा न होणारी महिला असल्याचे भासवले जाते. ‘आई बनायचे आहे’ या भावनिक मुद्द्याला आणि मोठ्या रकमेच्या आमिषाला बळी पडून नोकरदार, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे तरुण या जाळ्यात अडकत आहेत.

संपर्क वाढल्यानंतर निवडीच्या नावाखाली अंगप्रदर्शन करण्यास भाग पाडले जाते. व्हिडिओ कॉलदरम्यान छायाचित्रे व व्हिडिओ रेकॉर्ड करून घेतले जातात. पुढील टप्प्यात याच व्हिडिओंच्या आधारे ब्लॅकमेलिंग सुरू होते. मोठ्या रकमा उकळण्यासाठी धमक्या दिल्या जातात.

फसवणूक अधिक तीव्र करण्यासाठी संबंधित तरुणाची फेसबुक प्रोफाइल तपासून नातेवाईक, मित्र, सहकारी यांची माहिती गोळा केली जाते. रेकॉर्ड केलेले व्हिडिओ किंवा त्यांचे स्क्रीनशॉट व्हॉट्सअॅपवर पाठवून ‘व्हायरल करू’ अशी धमकी दिली जाते. काही वेळा प्रत्यक्षात व्हिडिओ मित्र किंवा सहकाऱ्यांना पाठवून त्याचे स्क्रीनशॉट पुन्हा पीडिताला पाठवले जातात. समाजात बदनामी होईल, या भीतीपोटी अनेक जण पैसे देण्यास भाग पडतात.

यानंतर टप्प्याटप्प्याने पैसे उकळले जातात. प्रथम ‘कॉन्ट्रॅक्ट’ तयार करण्यासाठी रजिस्ट्रेशन फी मागितली जाते. मेल आयडी ‘व्हीआयपी डेटाबेस’मध्ये नोंदणीसाठी ओळख पडताळणी शुल्क घेतले जाते. पेमेंट रिलीजसाठी जीएसटी, प्रोसेसिंग चार्ज, सिक्युरिटी डिपॉझिट आवश्यक असल्याचे सांगितले जाते. शेवटी कायदेशीर प्रक्रिया व गोपनीयता कराराच्या नावाखाली लीगल टीम व वकिलांचे शुल्कही मागितले जाते.

सायबर पोलिसांनी नागरिकांना अशा आमिषपूर्ण संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद मेसेज किंवा कॉल आल्यास तात्काळ तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon