इन्स्टाग्रामवरील मैत्री आणि मुलींच्या वादातून; शिर्डीत भरदुपारी तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

Spread the love

इन्स्टाग्रामवरील मैत्री आणि मुलींच्या वादातून; शिर्डीत भरदुपारी तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

योगेश पांडे / वार्ताहर

शिर्डी – शिर्डी शहरात बुधवारी दुपारच्या सुमारास एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इन्स्टाग्रामवरील मैत्री आणि मुलींच्या वादातून हा प्रकार घडला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. भरचौकात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून शिर्डीतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

जखमी तरुणाचे नाव निरज चौधरी असून त्याच्यावर एअरपोर्ट रोडवरील अग्निशमन केंद्र चौकात हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर निरजला तातडीने साई संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास चक्र वेगाने फिरवली असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जखमी निरज चौधरी आणि आरोपींची संगमनेर येथील अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलींसोबत इंस्टाग्रामवर मैत्री झाली होती. बुधवारी दुपारी या तिन्ही मुली कॉलेजमधून थेट शिर्डीला आल्या होत्या. यावेळी निरज चौधरी हा त्या मुलींसोबत असताना दुचाकीवरून आलेल्या तीन तरुणांनी त्यांना अडवले. काही कळण्याच्या आतच आरोपींनी निरजवर धारदार शस्त्राने वार केले आणि तिथून पळ काढला. भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात नागरिकांची मोठी पळापळ झाली.

या प्रकरणातील आरोपींची नावे आता समोर आली असून रोहीत कोळेगे, सुमित गुंजाळ आणि त्यांच्यासोबत असलेला आणखी एक युवक असे तिघे जण सध्या फरार आहेत. पोलीस या तिन्ही आरोपींचा शोध घेत असून त्यांच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, या घटनेत सामील असलेल्या तिन्ही अल्पवयीन मुलींना पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले आहे. त्यांच्या पालकांना या घटनेची कल्पना देण्यात आली असून त्यांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून या हल्ल्यामागील नेमके कारण लवकरच स्पष्ट होईल असे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon