महाराष्ट्रात माणुसकीला काळिमा! खासगी सावकाराने छळ छळ छळलं; कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्याला विकायला लावली किडनी
योगेश पांडे /वार्ताहर
चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. इथं एका खासगी सावकारानं आपल्या कर्जाचे पैसे वसूल करण्यासाठी एका तरुण शेतकऱ्याला चक्क त्याची किडनी विकायला भाग पाडल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. हा आरोप संबंधित शेतकऱ्यानेच केला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
नागभीड तालुक्यातील मिंथुर येथील रहिवासी असलेल्या रोशन कुडे या तरुण शेतकऱ्याने धक्कादायक आरोप केला आहे. काही वर्षांपूर्वी रोशन यांनी आपला दुधाचा व्यवसाय सुरू करण्याच्या हेतूनं एका खासगी सावकाराकडून एक लाख रुपये व्याजाने घेतले होते. मात्र, दुर्दैवाने त्यांचे पशुधन मरण पावले आणि त्यांना व्यवसायात मोठे नुकसान झाले. परिणामी, ते सावकाराचे कर्ज फेडू शकले नाहीत.कर्ज फेडण्यास विलंब झाल्याने मुद्दल आणि व्याजाची रक्कम प्रचंड वाढली. यानंतर सावकाराने पैशांसाठी वारंवार रोशन यांच्याकडे तगादा लावला. पण रोशन यांच्याकडे उत्पन्नाचं साधन नसल्याने ते सावकाराचं कर्ज फेडू शकले नाहीत.
रोशन कुडे यांच्या आरोपानुसार, जेव्हा कर्जाचा डोंगर वाढत गेला आणि सावकाराचा दबाव पराकोटीला पोहोचला, तेव्हा त्याच सावकाराने रोशनला पैसे फेडण्यासाठी चक्क आपली किडनी विकण्याचा सल्ला दिला. सावकाराच्या जाचाला कंटाळून आणि दुसरा कोणताही पर्याय नसल्याने, पीडित शेतकऱ्याने सावकाराच्या सल्ल्यानुसार आधी कोलकाता आणि त्यानंतर कंबोडिया येथे जाऊन आपली एक किडनी ८ लाख रुपयांना विकली. सावकारामुळेच माझ्यावर ही भयंकर वेळ आल्याचा आरोप रोशन कुडे यांनी केला आहे.
एक लाख रुपयांच्या कर्जासाठी एका शेतकऱ्यावर स्वतःची किडनी विकायची वेळ आल्याने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे. संबंधित खासगी सावकारावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता कुडे यांनी केली आहे. आता राज्य सरकार, कृषीमंत्री आणि पोलीस प्रशासन या घटनेबाबत काय पावलं उचलणार? ते पाहावं लागणार आहे.