शाळेला खेटून अवैध पान–गुटखा विक्री; नशेखोरांची गर्दी, मुलांचे पालक संतप्त

पनवेल : बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागूनच अवैध तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार नवीन पनवेल पूर्वेकडील शबरी हॉटेल परिसरात उघड झाला आहे. डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाऊंडेशन संचालित विशेष शाळेजवळ “सौरभ गौरव पान शॉप” नावाने सुरू असलेल्या दुकानात हक्काचा फ्लेवर, ई-सिगारेट, पान मसाला, गुटखा आदी नशायुक्त पदार्थ खुलेआम विकले जात असल्याची तक्रार पालकांनी केली आहे.
दुकानासमोर दिवसभर नशेचे पदार्थ सेवन करणारे युवक, गंजेडी आणि बेरोजगारांची गर्दी जमल्याने शाळेत येणाऱ्या-जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर मानसिक दडपण येत आहे. आधीच संवेदनशील असलेल्या या मुलांना दररोज धोकादायक वातावरणातून जावे लागत असून, “मुलींना शाळेत सोडतानाही भीती वाटते,” अशी भावना अनेक पालकांनी व्यक्त केली.
शाळेच्या गेटलगत असलेले हे दुकान सुप्रीम कोर्टाच्या २००४ च्या आदेशाचे तसेच COTPA कायदा २००३ च्या कलम ६ चे सरळ उल्लंघन करणारे आहे. या कायद्यानुसार शाळेपासून १०० यार्ड अंतरात कोणत्याही प्रकारच्या तंबाखूजन्य वस्तूंची विक्री प्रतिबंधित आहे. पालकांनी या प्रकरणाची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात नोंदवली असून कारवाईची मागणी केली आहे.
या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ. स्मिता ढाकणे यांच्या हस्तक्षेपाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पालकांचा सवाल कायम आहे—“विशेष मुलांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर पोलीस प्रशासन किती गंभीर? नशेचा हा अड्डा तत्काळ हटणार का?”
परिसरात वाढत चाललेल्या नशेच्या वावरामुळे केवळ शाळेचे वातावरणच नव्हे तर संपूर्ण परिसर असुरक्षित बनल्याचे चित्र आहे. या अवैध दुकानावर त्वरीत कारवाई होणार की पालक व विद्यार्थ्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.