पुण्यात किरकोळ कारणावरून झालेल्या वादात मित्राकडून मित्राचा निर्दयी पद्धतीने खून
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुण्यामध्ये अल्पवयीन व तरुणांच्या वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असून, त्यातही चंदननगर परिसरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येरवडा जवळील ऑक्सिजन पार्कमध्ये मित्रांनीच एका १९ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
शनिवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. लखन उर्फ सोन्या सकट (१९) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, लखन आणि आरोपी यांच्यात शुक्रवारी रात्री किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हे वाद मिटवण्यासाठी लखन शनिवारी रात्री आपल्या मित्रासह ऑक्सिजन पार्कमध्ये गेला. मात्र याच वेळी आरोपींनी आधीच योजना आखून ताकत केली होती.आरोपी प्रथमेश दर्डू आणि यश गायकवाड हे धारदार शस्त्रांसह उद्यानातच दबा धरून बसले होते. लखन उद्यानात येताच त्याच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आरोपींनी लखनच्या हातांवर, पायांवर, पोटावर, तोंडावर आणि डोक्यावर सलग २० ते २५ वार केले. वारांची तीव्रता इतकी होती की त्याचा जागीच मृत्यू झाला.
जुन्या मुंढवा रस्त्यालगतचे ऑक्सिजन पार्क हे दररोज गर्दीने भरलेले उद्यान आहे. मात्र, येथे असा थरकाप उडवणारा खून घडल्यामुळे स्थानिक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त प्रांजली सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपासाला सुरुवात केली आहे. आरोपींच्या हालचाली, उद्यानातील सीसीटीव्ही फुटेज आणि त्या दिवशी उद्यानात उपस्थित असणाऱ्यांची चौकशी सुरू आहे.