उरण–पनवेल पट्ट्यात पेट्रोलियम पदार्थांच्या अवैध साठ्यावर गंभीर आरोप
शिवसेना कार्यालयाच्या पार्किंगचा ‘गोडाऊन’ म्हणून वापर झाल्याचा दावा; पोलिसांवर दुर्लक्षाचा आरोप
उरण – उरण–पनवेल परिसरात पेट्रोलियम उत्पादने, फर्नेस ऑयल (काळे तेल) आणि विविध रसायनांची मोठ्या प्रमाणात चोरी व अवैध साठेबाजी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असल्याचे गंभीर आरोप स्थानिक सूत्रांकडून करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे उरण तालुक्यातील कुंडे गावातील एका शिवसेना शाखा कार्यालयाच्या पार्किंगचा या चोरीच्या मालाच्या साठवणीसाठी ‘गोडाऊन’ म्हणून वापर होत असल्याचा धक्कादायक दावा समोर आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास मोठ्या टँकर्सची पगोटे, कुंडे आणि खड्डा परिसरात सतत ये-जा सुरू असते. या ठिकाणी टँकर्समधून पेट्रोलियम पदार्थ उतरवले जातात व नंतर ते विविध मार्गांनी बाजारात वितरित केले जात असल्याचा आरोप आहे. या अवैध व्यवहारात काही स्थानिक व्यक्ती सक्रिय असल्याचेही सांगितले जात आहे.
स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की, शिवसेना कार्यालयाच्या पार्किंगमध्ये सातत्याने टँकर्स उभे असल्याचे दृश्य दिसत असून, त्यामुळे या अवैध धंद्याला राजकीय आश्रय मिळत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. विशेष बाब म्हणजे उरण पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हे कथित गैरप्रकार सुरू असतानाही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
जर हे आरोप सत्य ठरले, तर यामुळे पर्यावरणाला मोठा धोका, कोट्यवधी रुपयांचे करबुडवेपण, तसेच पेट्रोलियम कंपन्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय एका प्रमुख राजकीय पक्षाच्या स्थानिक कार्यालयाचा कथित गैरवापर हा अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे.
या संदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील डीसीपी (झोन-२) कार्यालय, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच शिवसेना उरण तालुका पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र वृत्तलेखनापर्यंत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
दरम्यान, या प्रकरणात तातडीने स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. अन्यथा, पोलीस यंत्रणेवरील जनतेचा विश्वास डळमळीत होईल, अशी भावना उरण–पनवेल परिसरात व्यक्त होत आहे.