तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयात क्लास वन अधिकारी असल्याचे सांगत हिरे व्यापाऱ्याला कोट्यवधी रुपयांचा गंडा; एलटी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयामध्ये क्लास वन अधिकारी असल्याचे सांगून हिरे व्यापाऱ्याला तब्बल दोन कोटी ८० लाखांना चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी वैभव ठाकर असे त्याचे नाव आहे. त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयामध्ये क्लास वन अधिकारी सांगत त्याने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. ठाकरच्या फसवणुकीचा फक्त महाराष्ट्रामध्ये कारनामा नसून त्याने गोव्यामध्ये सुद्धा जाऊन पराक्रम केल्याचे दिसून आलं आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीमध्ये आरोपी वैभव ठाकरने गोवा पोलिसांना ३१ लॅपटाॅप वाटले होते.
वैभव ठाकरने उत्तराखंड, गोवा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत जवळीक असल्याचे सांगत चुना लावला आहे. आतापर्यंत सोने, रोख रक्कम, हिरे असे मौल्यवान दागिने घेऊन फसवणूक केली असल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ठाकरविरोधात एलटी मार्ग पोलीस ठाण्यामध्ये फसवणूक, बनाव आणि कट रचून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, वैभव ठाकरचा कारनामा इतक्यावरच थांबलेला नाही. मुख्यमंत्र्यांसोबत उठबस असल्याचे सांगत मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यावर गाडी घेऊन जायचं आणि सीएम नाहीत म्हणून बाहेरून यु टर्न घ्यायचा असाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकेच नव्हे तर पिवळ्या दिव्याच्या कारमधून तो बसून मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्यावर व्यापाराला घेऊन आला होता. मात्र, मुख्यमंत्री नसल्याचे सांगत त्याने बोळवण केली होती. दरम्यान शैलेश जैन हे जमिनी बाजार मधील व्यापारी आहेत.