कल्याणमध्ये गावगुंड आणि नशेखोरांचे ‘राज’; दुकानदाराच्या पत्नीला मारहाण करतानाचा थरार

Spread the love

कल्याणमध्ये गावगुंड आणि नशेखोरांचे ‘राज’; दुकानदाराच्या पत्नीला मारहाण करतानाचा थरार

योगेश पांडे / वार्ताहर

कल्याण – कल्याण पूर्वेकडील आडीवली ढोकळी परिसरात सध्या गावगुंड आणि नशेखोरांची दहशत मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. बुधवारी पहाटेच्या आणि रात्रीच्या सुमारास या गुंडांनी परिसरात अक्षरशः हैदोस घातला. त्यांनी एका निष्पाप दुकानदार, त्यांची पत्नी आणि एका रिक्षाचालकाला क्रूरपणे मारहाण केली, तसेच परिसरातील दुकानाचे आणि उभ्या असलेल्या वाहनांचे मोठे नुकसान केले आहे. या सततच्या त्रासामुळे स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, तातडीने पोलिस बीट चौकी उभारण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

कल्याण पूर्वेतील आडीवली ढोकळी परिसर सध्या स्थानिक सराईत गुन्हेगारांमुळे दहशतीत आहे. हे गावगुंड नशा करून रस्त्यांवर उतरतात आणि कोणत्याही नागरिकाला विनाकारण त्रास देतात किंवा पैशांसाठी मारहाण करतात. त्यांच्या या कृत्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

बुधवारी रात्री गणेश चौक परिसरात या नशेखोरांनी दहशत माजवली. नारायणलाल चौधरी यांच्या किराणा मालाच्या दुकानासमोर त्यांनी वाद घालायला सुरुवात केली. हातात लोखंडी सळया आणि काठ्या घेऊन या गुंडांनी दुकानदार नारायणलाल चौधरी यांना विनाकारण मारहाण केली. आपल्या पतीला वाचवण्यासाठी त्यांची पत्नी मध्ये गेली असता, गुंडांनी त्यांनाही जबर मारहाण केली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या गुंडांनी मारहाण करून थांबले नाही, तर त्यांनी आजूबाजूला उभ्या असलेल्या वाहनांचीही तोडफोड केली. यावेळी एका रिक्षाचालकालाही त्यांनी मारहाण केल्याचे वृत्त आहे. या नशाखोरांनी बुधवारी पहाटेच्या सुमारास देखील परिसरात अशीच दहशत माजवली होती, ज्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.परिसरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे स्थानिक समाजसेविका सोनी शीरसागर यांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार गणेश चौकात अशा घटना घडत असल्याने, त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्याकडे तातडीने पोलिस बीट (चौकी) उभारण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, मानपाडा पोलिसांनी ही मागणी मान्य केली आहे, परंतु महापालिकेकडून हे काम अडले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon