‘लोकांत जाऊ नको, दीड-दोन महिने आराम कर’ — राज ठाकरेंचा संजय राऊतांना प्रेमळ सल्ला
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी (३ नोव्हेंबर) शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या वेळी राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस करत “लोकांत जाऊ नकोस, दीड-दोन महिने पूर्ण आराम कर” असा प्रेमळ सल्लाही दिला.
संजय राऊत यांना काही दिवसांपूर्वी गंभीर आजाराचे निदान झाले होते. त्याबाबतची माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे काही काळ सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. मात्र, सध्या त्यांच्या प्रकृतीत अपेक्षेपेक्षा लवकर सुधारणा होत असल्याची माहिती समोर येत आहे.
राज ठाकरे यांच्या या भेटीनंतर ठाकरे गटाचे आमदार व संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
“राज ठाकरे गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत माझ्याशी संपर्कात होते. उपचारांसाठी यूएसला न्यावे का, याबाबतही ते चर्चा करत होते. आज तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे आमच्या घरी आले, याचा आम्हाला खूप आनंद आहे,” असे सुनील राऊत म्हणाले.
राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात सुमारे २५ ते ३० मिनिटे चर्चा झाली. “तुझा आजार जसा आहे, त्यानुसार जीवनशैली ठेव. काही काळ लोकांत न जाता पूर्ण विश्रांती घे,” असा सल्ला राज ठाकरे यांनी दिल्याचेही सुनील राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, राज ठाकरे यांनी यापूर्वी आपल्या घरात झालेल्या भेटीची आठवण काढत त्या वेळी रस्त्याची परिस्थिती कशी होती, यावरही हलक्याफुलक्या शब्दांत चर्चा केल्याचे सुनील राऊत यांनी सांगितले.
राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यातील या आपुलकीच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळातही सकारात्मक चर्चांना सुरुवात झाली आहे.