देवेंद्र फडणवीस–संजय राऊत भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; आशिष शेलारही उपस्थित
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची अचानक भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ही भेट संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात मंगळवारी झाली. या वेळी भाजप नेते आशिष शेलार हे देखील उपस्थित होते.
या भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांना गंभीर आजाराचे निदान झाले होते. याची माहिती त्यांनी स्वतः सोशल मीडियावर दिली होती. डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे काही काळ ते सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र, प्रकृतीत लवकर सुधारणा झाल्याने ते पुन्हा हळूहळू सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहू लागले आहेत.
मंगळवारी झालेल्या विवाहसोहळ्यात देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात सुमारे १५ मिनिटे हसतखेळत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या चर्चेदरम्यान आशिष शेलार हे देखील त्यांच्या बाजूला बसले होते. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या विवाहसोहळ्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे हेही उपस्थित होते. मात्र, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट झाली की नाही, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, राजकीयदृष्ट्या परस्परविरोधी भूमिका असलेल्या फडणवीस आणि राऊत यांच्यातील ही भेट सध्या राजकीय चर्चेचा विषय ठरत असून, विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.