कर्जाच्या नावाखाली पोल्ट्री व्यावसायिकाची फसवणूक; पाच जणांवर शहापूर पोलिसांत गुन्हा दाखल
महेंद्र उर्फ अण्णा पंडित/ वार्ताहर
शहापूर – “व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज मिळवून देतो” असे सांगत एका पोल्ट्री व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक करणाऱ्या टोळीविरुद्ध शहापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार नंदकुमार रत्नाकर यांच्या तीन वर्षांच्या पाठपुराव्यानंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, दोषींवर कठोर कारवाई तसेच अटक करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे.
तक्रारदार नंदकुमार रत्नाकर (रा. शहापूर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा २०२२ पासून शहापूरजवळील गोठेघर परिसरात कोंबड्यांना खाद्य पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. या कामातून त्यांची ओळख मुरबाड तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिक अनिकेत म्हात्रे यांच्याशी झाली होती. “तुमचा व्यवसाय मोठा करू, कर्ज मिळवून देतो” असे आश्वासन देत अनिकेतने नंदकुमार यांना ३५ लाखांच्या कर्जासाठी प्रवृत्त केले.
कर्ज प्रक्रियेच्या नावाखाली अनिकेतने नंदकुमार यांच्याकडून ३ लाख ५० हजार रुपये घेतले. जुलै २०२२ मध्ये अनिकेत काही कथित वित्तीय संस्थेचे कर्मचारी घेऊन रत्नाकर यांच्या कार्यालयात आला. त्यांनी विविध कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या करून घेतल्या व कर्ज लवकरच मंजूर होईल असे सांगितले.
तथापि, नंदकुमार यांनी मागितलेल्या ३५ लाखांऐवजी फक्त १७ लाख १७ हजार रुपये जानेवारी २०२३ मध्ये त्यांच्या खात्यात जमा झाले. या रकमेतून ५० हजार रुपये अनिकेतने पुन्हा घेतले. “उर्वरित रक्कम दोन टप्प्यांत मिळेल” असे आश्वासनही देण्यात आले. मात्र, जेव्हा नंदकुमार यांनी थेट वित्तीय संस्थेशी संपर्क साधला तेव्हा पुढील कर्ज रक्कम मंजूर होणार नाही, असे त्यांना सांगण्यात आले.
यानंतर आणखी धक्कादायक बाब समोर आली. कर्जाची रक्कम वसई येथील संस्थेला परत करण्याची तयारी नंदकुमार यांनी दर्शवली असताना, ती रक्कम परत न जाता ठाणे येथील दुसऱ्या संस्थेच्या खात्यात वर्ग झाल्याचे आढळले. मे २०२३ मध्ये “कर्ज हप्ते थकले” म्हणून वसई संस्थेकडून नोटिसा आल्या व कर्ज न फेडल्यास घर सील करण्याची चेतावणी देण्यात आली. दरम्यान, कर्ज मंजूर करणारे कथित कर्मचारी बेपत्ता झाले.
या सर्व प्रकरणांवर अनिकेत म्हात्रे व इतर आरोपींनी अंग झटकत, उलट नंदकुमार यांना मारण्याच्या धमक्या दिल्याची माहिती तक्रारीत नमूद आहे.
शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात येत नंदकुमार रत्नाकर यांनी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अनिकेत म्हात्रे, चंद्रप्रकाश शर्मा, ज्योती गुप्ता, अशितोष यादव आणि तेजस गुरव या पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपींना अटक करण्याची मागणी तक्रारदाराकडून करण्यात आली आहे.