महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात २९ नोव्हेंबर रोजी ‘व्हिजिट माय पोलीस स्टेशन’ उपक्रम; नागरिक–पोलीस संवाद दृढ करण्यासाठी आवाहन
पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण – पोलिसांबद्दल नागरिकांच्या मनात असणारी अनावश्यक भिती दूर करून, त्यांच्याशी अधिक सकारात्मक संवाद प्रस्थापित करण्याच्या हेतूने कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्यात उद्या, २९ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘व्हिजिट माय पोलीस स्टेशन’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत होणाऱ्या या उपक्रमात पोलिसांच्या कामकाजाची माहिती, कायदेशीर मार्गदर्शन आणि दैनंदिन कार्यपद्धती याबद्दल नागरिकांना प्रत्यक्ष जाणून घेण्याची संधी मिळणार आहे.
हा उपक्रम महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, ठाणे जिल्हा प्राधिकरण, ठाणे पोलीस आयुक्तालय, ग्लोबल केअर फाउंडेशन आणि नॅशनल सर्व्हिस स्कीम यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असून, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या संकल्पनेतून त्याला आकार देण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश नागरिक–पोलीस नात्यातील विश्वास वाढवणे, तक्रारी व अडचणींवर तात्काळ संवाद साधणे, आवश्यक कायद्यांची माहिती देऊन जनजागृती करणे हा असल्याचे महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम परदेशी यांनी सांगितले.
महात्मा फुले चौक पोलीस ठाणे हद्दीतील नागरिक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी व शिक्षक, डॉक्टर, अभियंते तसेच खासगी व शासकीय कर्मचारी यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
भावी सण-उत्सव व बंदोबस्ताच्या काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस–नागरिकांनी एकत्रितपणे कार्य करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल. विविध विषयांवर नागरिकांना थेट पोलिसांशी चर्चा करण्याची संधी मिळणार असल्याने, अधिकाधिक नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम परदेशी यांनी केले आहे.