महिला सक्षमीकरणासाठी इनरव्हील क्लब ऑफ वाईचा उपक्रम; मोफत वाहन प्रशिक्षण व परवाना देऊन स्वावलंबनाकडे महिलांचा टप्पा
रवी निषाद / वार्ताहर
वाई : महिला सक्षमीकरणाच्या दिशेने इनरव्हील क्लब ऑफ वाईतर्फे एक प्रभावी आणि स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. महिलांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणे, त्यांना स्वावलंबनाकडे प्रवृत्त करणे आणि महिलांवरील अत्याचारांविरोधात जागृती निर्माण करणे या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
या सामाजिक कार्यात विनय मोटर ट्रेनिंग स्कूल यांनी पुढाकार घेत सहभाग नोंदवला. काही महिलांना मोफत वाहन प्रशिक्षण व वाहन परवाना देण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. त्यामुळे अनेक महिलांसाठी रोजगाराच्या, व्यवसायाच्या आणि स्वयंपूर्णतेच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या.
इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. रूपाली विनय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि क्लबच्या सदस्यांच्या उत्साहपूर्ण सहभागातून हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत या उपक्रमाचे कौतुक केले. “आत्मविश्वास देणारा आणि खऱ्या अर्थाने सक्षम करणारा उपक्रम,” अशा शब्दांत अनेक महिलांनी समाधान व्यक्त केले.
महिलांच्या स्वावलंबन, सुरक्षितता आणि सक्षमीकरणाचा संदेश देत इनरव्हील क्लब ऑफ वाई आणि विनय मोटर ट्रेनिंग स्कूल यांनी राबवलेला हा उपक्रम स्थानिक पातळीवर आदर्श ठरत आहे.