दिल्ली स्फोटाची भीती दाखवत ७१ वर्षीय ज्येष्ठाची २९ लाखांची सायबर फसवणूक
पोलीस महानगर नेटवर्क
नागपूर : दिल्ली स्फोट प्रकरणात नाव अडकल्याचे भय निर्माण करून सायबर गुन्हेगारांनी ७१ वर्षीय सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याला तब्बल २९.३० लाखांनी गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माधवनगर परिसरात राहणाऱ्या या ज्येष्ठांना सलग ११ ते २१ नोव्हेंबरदरम्यान बनावट पोलीस व एटीएस अधिकाऱ्यांच्या व्हिडीओ कॉलद्वारे धमकावण्यात आले.
११ नोव्हेंबर रोजी आलेल्या पहिल्या व्हिडीओ कॉलमध्ये एका व्यक्तीने स्वतःला मुंबई पोलीस मुख्यालयातील उपनिरीक्षक सुमित मिश्रा असल्याचे सांगत पीडितांचे नाव दिल्ली स्फोटाशी संबंधित मनी लॉंड्रिंग प्रकरणात आल्याचा खोटा आरोप केला. त्यानंतर येणाऱ्या सातत्यपूर्ण कॉलमध्ये गुन्हेगारांनी कॅमेरा ऑन ठेवण्यास भाग पाडत सहकार्य केले नाही तर अटक होईल, अशा धमक्या दिल्या. काही कॉलमध्ये आरोपींनी स्वतःला दिल्ली तसेच लखनऊ एटीएसचे अधिकारी म्हणूनही परिचय दिला.
भीतीचा फायदा घेत आरोपींनी ज्येष्ठांकडून मालमत्तेची संपूर्ण माहिती मिळवली. पाठवलेल्या बनावट ‘सर्वोच्च न्यायालयाच्या’ अटक वॉरंटनंतर त्यांनी पैशांची मागणी सुरू केली. जीव वाचेल या भ्रमात वृद्धाने एफडी मोडून २९.३० लाख रुपये आरोपींच्या खात्यात जमा केले. मात्र तरीही धमकावणे थांबले नाही. पैशांची कमतरता असल्याचे सांगितल्यावर मालमत्तेवर किंवा पेन्शनवर कर्ज काढा, असा दबाव आरोपींनी आणला.
२४ नोव्हेंबरला पैसे परत देऊ असे सांगून गुन्हेगारांनी फोन बंद केले. यानंतर मुलाला प्रकार सांगितल्यावर फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. तक्रार मिळताच सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवून संबंधित खात्यातील मनी ट्रेल तपासण्यास सुरुवात केली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.