अंबरनाथमध्ये शिंदे गट–भाजप कार्यकर्त्यांमध्ये तणाव; भाजप कार्यकर्त्यावर कोयत्याने हल्ला
पोलीस महानगर नेटवर्क
अंबरनाथ : नगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ शहरात राजकीय वातावारण तापले असून सर्वोदय नगर परिसरात भाजप कार्यकर्त्यावर कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भाजप कार्यकर्ता सत्यम तेलंगे हा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याच्या उजव्या हाताला खोलवर जखम झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, भाजप उमेदवाराचा प्रचार करू नये, अशा धमकीनंतर शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साहिल वडनेरे याने हा हल्ला केल्याचा आरोप सत्यम तेलंगे यांनी केला आहे. वाद पॅनल क्रमांक ५ मधील सर्वोदय नगर–बुवापाडा भागात प्रचाराच्या वेळी झाला.
घटनेनंतर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या बयानांची नोंद घेतली आहे. मात्र, साहिल वडनेरे हा शिंदे गटाचा अधिकृत कार्यकर्ता नसल्याचा दावा शिवसेना (शिंदे गट)चे स्थानिक पदाधिकारी शैलेश भोईर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केला आहे. त्यांनी हल्ल्याचा निषेध करत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी केली.
जखमी सत्यम तेलंगे यांनी सांगितले की, “प्रचार करत असताना अचानक माझ्यावर हल्ला करण्यात आला. माझा जीव वाचला हे नशीब.” घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. पुढील तपास अंबरनाथ पोलीस करत आहेत.