वाकोला पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अपहरण झालेली ५ वर्षांची मुलगी सुखरूप परत, एकूण ५ जण अटकेत
सुधाकर नाडार/ मुंबई
मुंबई : वाकोला पोलिसांनी एका संवेदनशील अपहरण प्रकरणाचा पर्दाफाश करत तब्बल ५ आरोपींना अटक केली असून अपहृत ५ वर्षीय मुलीची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी साडेबारा वाजता फिर्यादी महिलेच्या कायदेशीर ताब्यातून अज्ञात व्यक्तीने मुलीचे अपहरण केल्याची तक्रार नोंद होताच परिमंडळ ८ च्या गुन्हे प्रकटीकरण अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने सात पथके तयार करण्यात आली.
तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फूटेज, गुप्त माहिती आणि दोन दिवस चाललेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. तपासात अपहरणासाठी वापरण्यात आलेल्या एका संशयास्पद ऑटोरिक्षाचे वर्णन मिळाले. नंबर प्लेट नसतानाही त्या रिक्षेचा मागोवा घेत चालक लतीफ शेख याला वाकोला–सांताक्रूझ परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत या प्रकरणात मुलीचे मामा लॉरेन्स फर्नांडिस (४२) आणि मामी मंगल जाधव (३८) यांनीच अपहरण केल्याचा धक्कादायक खुलासा झाला.
त्यानंतर दोघांना पनवेल परिसरातून जेरबंद करण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी मुलीला करण मारुती सनस याला ₹९०,००० मध्ये विकल्याचे कबूल केले. पुढील तपासात करण सनस याने मुलीला वृंदा विनेश चव्हाण (६०) आणि अंजली अजित कोरगावकर (५७) यांना ₹१,८०,००० मध्ये विकल्याचे उघड झाले. पोलिसांनी तत्परतेने चव्हाण यांच्या न्यू पनवेल येथील घरावर छापा टाकून मुलीची सुखरूप सुटका केली.
अटक आरोपींमध्ये लतीफ शेख – रिक्षाचालक, लॉरेन्स फर्नांडिस – मुख्य आरोपी, मंगल जाधव – सहआरोपी, करण मारुती सनस – मुलीचा खरेदीदार व वृंदा विनेश चव्हाण – मुलगी ताब्यात घेणारी महिला यांचा समावेश आहे.
या कारवाईत पोलीस आयुक्त देवेन् भारती, सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त परमजित सिंह दहिया, उपपोलीस आयुक्त मनीष कलवानिया, सहाय्यक पोलीस आयुक्त ज्योत्स्ना रासम तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाकोला, विलेपार्ले, निर्मलनगर, खेरवाडी, बीकेसी आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पोलिसांच्या वेगवान आणि काटेकोर तपासामुळे एका निरपराध बालिकेचा जीव वाचवण्यात यश आले असून स्थानिक स्तरावर या कारवाईचे व्यापक कौतुक होत आहे.