वसईत क्लोरिन वायूची गळती, हवेत अचानक हिरव्या रंगाचा वायू; वसईत एकाचा मृत्यू तर ११ जण रुग्णालयात
योगेश पांडे / वार्ताहर
वसई – वसईमध्ये क्लोरिनच्या सिलेंडर लीक झाल्याची घटना घडली आहे. वसई पश्चिमेच्या दिवानमाण परिसरात क्लोरिन सिलेंडर लीक झाला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून ११ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे वृत्त आहे.
मंगळवारी दुपारी साडे चारच्या सुमारास वसई पश्चिमेच्या दिवानमाण परिसरात अचानकपणे हवेत हिरव्या रंगाचा वायू पसरला. काही कळायच्या आत लोकांना श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला. काही लोकांना उलट्या देखील होऊ लागल्या. काहींच्या डोळ्यांना जळजळ होण्याचा त्रास झाला.
कुठल्याशा वायूने आपल्याला त्रास होतो आहे, हे लक्षात आल्यानंतर तेथील लोकांनी स्थलांतर केले. परंतु दरम्यानच्या काळात एक जणाचा मृत्यू झाला होता. तसेच ११ लोकांना जास्त त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. खासगी रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांवर उपचार करीत आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
घटनेची माहिती समजल्यावर तत्काळ फायर ब्रिगेड, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्रास होणाऱ्या नागरिकांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. तसेच तेथील परिसर त्वरेने खाली करण्यात आले.