पाईपलाईनच्या कामामुळे ठाण्यात बुधवारी २४ तासांसाठी बंद राहणार पाणीपुरवठा
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट, लोकमान्य नगर आणि सावरकर नगर या भागामध्ये राहणाऱ्या पाणी पुरवठा होणार आहे. येत्या बुधवारी म्हणजेच आज २६ नोव्हेंबर रोजी या दोन विभागांमध्ये पाणी पुरवठा होणार नाहीये. पाण्याच्या पाईपलाईनच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पाईपलाईनच्या कामाकरिता तब्बल १२ तास पाणी पुरवठा बंद राहिल. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती, लोकमान्य नगर आणि सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर पंप येथे पाणी पुरवठा करण्यासाठी अलीकडच्या काळात ११६८ मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे. ही जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी इंदिरानगर नाका येथे ७५० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवर व्हॉल्व्ह बसवण्याचे काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे ठाणे महानगर पालिकेने या कामासाठी विशेष शटडाऊन जाहीर केले आहे. ठाणे महानगर पालिकेच्या एक्स अकाऊंटवरून बुधवारी ठाण्यामध्ये पाणी पुरवठा होणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
नवीन टाकण्यात आलेल्या जलवाहिनीला व्हॉल्व्ह बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामामुळे बुधवारी वागळे इस्टेट आणि लोकमान्य नगर या भागामध्ये पाणी पुरवठा चोवीस तासांसाठी बंद राहणार आहे. बंदनंतर पुढचे एक ते दोन दिवस या भागामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहेत. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून २७ नोव्हेंबर २०२५ च्या सकाळी ९ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. २४ तास पाणी बंद राहणार असल्यामुळे महानगर पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
या कालावधीत ठाणे महापालिकेअंतर्गत इंदिरानगर जलकुंभ, श्रीनगर जलकुंभ, वारलीपाडा जलकुंभ, कैलासनगर रेनो टँक, रुपादेवी जलकुंभ, रुपादेवी रेनो टँक, रामनगर जलकुंभ, येऊर एअर फोर्स जलकुंभ, लोकमान्य जलकुंभ अंतर्गत या परिसरांचा पाणी पुरवठा २४ तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढचे १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची नोंद नागरिकांनी घ्यावी. तसेच पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने करुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.