पैशांच्या व्यवहारामुळे जावयाने केला घात; लाकडी पट्ट्या व दांड्याने निर्दयी प्रहार करत केली सासूची हत्या, नराधम जावयाला बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
रायगड – रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील मोठे भोम गावात ९ नोव्हेंबर रोजी घडलेली ९० वर्षीय हिराबाई जनार्दन जोशी यांच्या मृत्यूच्या गूढ घटनेत पोलीस तपासात अत्यंत धक्कादायक वळण घेत आहे. सुरुवातीला ही नैसर्गिक मृत्यूची घटना मानली जात होती. मात्र, उरण पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या पुराव्यांचा अभ्यास व प्राप्त पोस्टमार्टम अहवालाच्या आधारे हा मृत्यू बेदम मारहाणीचा परिणाम असल्याचं स्पष्ट केलं आहे. हिराबाईंच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा आढळल्या तर त्यांच्या घरातून लाकडी पट्ट्या व दांडेही जप्त करण्यात आले, ज्यांचा वापर हल्ल्यात झाल्याचा निष्कर्ष तपासात निघाला.
हिराबाई जोशी घरी एकट्याच राहत होत्या. अलीकडेच त्यांना जमिनीचे सुमारे १५ लाख रुपये मिळाले होते. त्या पैशांपैकी काही रक्कम त्यांनी आपल्या मुलींना दिली होती. तथापि, पैशांच्या या व्यवहारामुळे त्यांचा जावई सुरेश पाटील (४९) याच्या मनात लोभ वाढला. त्याने सासूबाईंकडे आणखी पैशांची मागणी केली होती. हिराबाई यांनी नकार दिल्याने संतापून त्याने त्यांच्या राहत्या घरात घुसून लाकडी दांड्याने त्यांच्यावर निर्दयी प्रहार केले. या मारहाणीमुळेच त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला
पोलिसांनी केलेल्या तपासातून आरोपीवर संशय गेला आणि त्याला काही तासांतच ताब्यात घेण्यात आलं. चौकशीत सुरेश पाटीलने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या हृदयद्रावक घटनेनं मोठे भोम गाव शोकमग्न झालं असून पैशांच्या हव्यासापोटी वृद्धेची हत्या झाल्याने जनतेत तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशा घटनांनी समाजातील नैतिकतेचे अध:पतन अधोरेखित होत असून, वृद्धांच्या सुरक्षेबाबत चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.