ठाण्यात राज ठाकरे यांच्याविरोधात शिवीगाळ करणारा रिक्षाचालक अखेर भानावर; पोलिस ठाण्यात जाऊन माफी मागितली
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : मागील काही दिवसांपासून मुंबई आणि ठाणे परिसरात मराठी–परप्रांतीय वादाच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशातच ठाण्यातील गांधीनगर परिसरात एका परप्रांतीय रिक्षाचालकाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेते अविनाश जाधव यांच्याविरोधात शिवराळ भाषा वापरल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणाने मनसैनिकांकडून जोरदार संताप व्यक्त होत असतानाच अवघ्या २४ तासांत संबंधित रिक्षाचालकाने पोलिस ठाण्यात हजेरी लावत कडकडीत माफी मागितली.
शैलेंद्र संतोष यादव असे या रिक्षाचालकाचे नाव असून किरकोळ कारणावरून त्याचा एका मराठी तरुणासोबत वाद झाला. वाद चिघळताच रिक्षाचालकाने राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांच्याबद्दल अपशब्दांचा वापर केला. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाल्यानंतर संतप्त मनसैनिकांनी त्याच्यावर कारवाईची मागणी केली.
दरम्यान, व्हिडीओचा गाजावाजा वाढताच यादव थेट पोलिस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याने स्वतःचा एक क्षमायाचनेचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. “मी शैलेंद्र संतोष यादव, हात जोडून माफी मागतो. वादाच्या भरात माझ्या तोंडातून चुकीचे शब्द निघाले. मी दारूच्या नशेत होतो. पुढे अशी चूक पुन्हा करणार नाही,” अशी कबुली त्याने दिली. त्याने पोलिसांसमोर कान धरून उठाबशा मारत प्रायश्चित्तही केले.
यादव पोलिसांच्या ताब्यात गेल्याने संभाव्य तणाव टळला असला तरी अनेक मनसैनिक अजूनही संतप्त असून “मनसे स्टाईल” उत्तर देण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा मराठी–परप्रांतीय प्रश्नावरून तापलेले वातावरण दिसून येत आहे.