कल्याण–डोंबिवलीत बेकायदेशीर लेडीज ताल बारवर छापा, १५ बारबाला सह २८ जणांवर गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण – पोलीस उपआयुक्त परिमंडळ ३ यांच्या विशेष पथकाने अवैधपणे सुरू असलेल्या लेडीज बारविरोधात रविवारी मोठी कारवाई करत महात्मा फुले चौक पोलीस ठाणे हद्दीतील ताल बारवर छापा टाकला. या कारवाईत १५ बारबाला तसेच मालक, चालक, मॅनेजर, कॅशियर, वेटर व ग्राहक अशा मिळून २८ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर २३ नोव्हेंबर रोजी विशेष पथकाने ताल रेस्टॉरंट अॅण्ड बार येथे छापा टाकला. तपासणीदरम्यान येथे नियमांपेक्षा अधिक महिलांना ठेवून त्यांच्याकडून अश्लील नृत्य करवून घेतले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्या महिलांना प्रोत्साहन देत असलेल्या १३ जणांवरही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा र.नं. ११७२/२०२५ नोंद करण्यात आला असून बीएनएस कलम २९६, २२३, ५४, ३(५) सह डान्सबार बंदी कायदा २०१६ मधील कलम ३, ४, ८(१)(२)(४) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कारवाईदरम्यान बारचे मालक, चालक, मॅनेजर, कॅशियर यांसह एकूण ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पुढील तपास महात्मा फुले चौक पोलीस ठाणे करीत असून परिमंडळ ३ अंतर्गत नियमभंग करणाऱ्या लेडीज बारविरुद्धची मोहिम पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.