धारावी पुनर्विकासावरील भव्य भाजपा सभा; वरिष्ठ नेत्यांकडून प्रकल्पाची सविस्तर माहिती
सुधाकर नाडार/ मुंबई

मुंबई — धारावीतील ९० फूट रोडवरील कामराज स्कूल परिसरात आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य जनसभेचे आयोजन करण्यात आले. आमदार तमिळ सेल्वन यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेला भाजपा मंत्री आशिष शेलार, तालुका–मंडल–वार्ड पातळीवरील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच धारावीतील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
सभेचा केंद्रबिंदू धारावी पुनर्विकास प्रकल्प हा होता. गेल्या दोन दशकांपासून विविध सरकारांकडून पुनर्विकासासंदर्भात धारावीकरांच्या मनात अनेक गैरसमज व चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केले.
यावेळी मंत्री आशिष शेलार आणि आमदार तमिळ सेल्वन यांनी डीआरपीच्या प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती देत सांगितले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धारावीतील रहिवासी, दुकानदार आणि लघुउद्योजकांसाठी धारावीतील आतल्या परिसरातच नव्या इमारतींचे बांधकाम सुरू केले आहे. यामुळे पुनर्विकसित घरे तसेच व्यावसायिक जागा स्थानिकांना उपलब्ध होणार आहेत.”
सभेत विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या गोंधळ आणि चुकीच्या माहितीवरही टीका करण्यात आली. डीआरपी विषयी लोकांमध्ये स्पष्टता निर्माण करण्यावर भर देत नेत्यांनी नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात धारावीकरांना नवी घरे उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानण्यात आले. मोठ्या संख्येने जमलेल्या लोकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सभा उत्साहपूर्ण आणि ऊर्जावान ठरली.