ठाणे पोलीस आयुक्तालयात ‘तक्रार निवारण दिन’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद; १०० दिवसांच्या कृती आराखड्यात ९६२ अर्जांची तात्काळ निर्गती
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे – ठाणे पोलीस आयुक्तालयात १०० दिवसांच्या कृती आराखड्याचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून ‘तक्रार निवारण दिन’ या उपक्रमाचे आयोजन शनिवार, २२ नोव्हेंबर आणि रविवार, २३ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या दोन दिवसीय तक्रार निवारण उपक्रमासाठी एकूण १५०१ अर्जदारांना बोलावण्यात आले होते, त्यापैकी १०५६ अर्जदार प्रत्यक्ष उपस्थित होते. नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
अर्जदारांच्या उपस्थितीत ९६२ तक्रारींची जागच्या जागी निर्गती करण्यात आली. उर्वरित अर्जदारांना स्वतंत्रपणे बोलावून त्यांचीही शंका-निरसन प्रक्रिया नियोजित करण्यात आली आहे.
तक्रारदारांना प्रत्यक्ष बोलावून त्यांचे प्रश्न समक्ष ऐकून तत्काळ कारवाई केल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, ठाणे शहर पोलिसांच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे.
ही माहिती पोलीस आयुक्तालय, ठाणे शहर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी शैलेश साळवी यांनी पत्रकारांना दिली.