लग्न सोहळ्यात मौल्यवान वस्तूंवर हाथसाफ करणारी टोळी गजाआड; रबाळे पोलीसांनी आरोपींना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई – लग्न सोहळ्यात चोरी गेलेल्या सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तूंच्या टोळीवर रबाळे पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ७ लाख ५३ हजार १०० रुपयांचा चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करून आरोपी अंजली प्रदीप दपानी हिला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईने लग्नातील चोरीची साखळी तुटल्याचे स्पष्ट झाले आहे. संबधित गुन्हा हा २ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४:३० ते सायंकाळी ६:२८ च्या दरम्यान लेवा पाटीदार समाज हॉल, सेक्टर १५, ऐरोली येथे घडला.
फिर्यादी शकुंतला दयाशंकर प्रसाद (६५) यांच्या सांगण्यानुसार, विवाह सोहळ्यात स्टेजवर ठेवलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. बॅगमध्ये सोन्याचे नेकलेस, इयररिंग जोड, चैन, नाकातील चमकी, चांदीचे पैजण, रोख रक्कम तसेच आयफोन १७ प्रो आणि आयफोन ११ मोबाईल फोन होते. या चोरीच्या घटनेची रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. अखेर पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने तपासाला सुरुवात केली.
गुन्हा नोंद झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अविनाश पाळदे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये दोन संशयित इसम आणि त्यांच्या वाहनाची स्पष्ट माहिती मिळाली. तपासातून आरोपी कडिया सान्सी, राजगड, मध्य प्रदेश येथे राहणारा असल्याचे निश्चित झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने ५ दिवसांच्या तपासानंतर आरोपीने चोरी केलेला मुद्देमाल महिलेस दिला असल्याचे उघड झाले आणि अंजली दपानी हिला ताब्यात घेऊन सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी लग्न सोहळ्यात मौल्यवान वस्तू असलेली बॅग चोरी करण्यासाठी लग्नाच्या ठिकाणी येतात आणि अशाच प्रकारच्या टोळ्या यापूर्वीही अनेक ठिकाणी पकडल्या गेल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईत सपोनि अविनाश पाळदे, पोहवा प्रसाद वायंगणकर, पोना विजय करंकाळ, पोना प्रल्हाद जाधव, पोशि प्रविण भोपी, पोशि अभिजीत राळे आणि पोशि राजेश तडवी यांनी सहभाग घेतला. ही कारवाई फक्त लग्नात चोरी थांबवण्यासाठी नाही, तर नागरिकांचा विश्वास आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी महत्त्वाची असल्याचे रबाळे पोलिसांनी सांगितले आहे.